घोषणेनंतरही बदल नाही : समता परिषदेने करून दिले स्मरणवर्धा : सेवाग्राम येथे ३० जानेवारी २०१५ रोजी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या पहिल्या सभेत ४ हजार ८०० शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी त्वरित देण्यात येईल, अशी घोषण केली होती; पण आठ महिने उलटले असतानाही जोडणी मिळाली नाही. आठ महिन्यांतही बदल न झाल्याने वीज जोडणी मिळणार की नाही, असा सवाल महात्मा फुले समता परिषदेने केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदनही देण्यात आले. शासनाने या पाच हजार शेतकऱ्यांच्या वीज जोडणीसाठी संपूर्ण सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी वीज वितरण कंपनीकडे चार वर्षांपासून दिला आहे; पण शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नाही. शेतकरी विहिरींच्या कर्ज व व्याजाचा भुर्दंड भरताना बेजार झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी देण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सभेत निर्देश देत नियोजनपूर्वक कार्यवाही करावी, अशी मागणी समता परिषदेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. सद्यस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही परिषदेने केली आहे.जिह्यातील पाच हजार शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी बांधल्या. वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्ज करून पाच वर्षापासून वीज जोडणी मिळावी म्हणून अनामत रक्कमही भरले. शासनानेही या शेतकऱ्यांना वीज मिळावी, शेतात खांब, वीज तार व ट्रान्सफार्मर या संपूर्ण खर्चासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करीत वीज कंपनीला निधी दिला; पण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अद्याप शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. चार लाखांच्या कर्जापायी आत्महत्या केल्यावरच शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळणार काय, असा सवालही समता परिषदेने केला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
पाच वर्षांपासून वीज जोडणीची प्रतीक्षा
By admin | Published: September 11, 2015 2:31 AM