वर्धा : शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात; मात्र हा पोशिंदा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. कधी निसर्गाचा कहर तर कधी राज्यकर्त्यांची उदासिनता. यात चौफेर फसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कार्याची ओळख देण्याकरिता राज्य शासनाने कृषी दिन निर्मित केला आहे. या दिवशी त्याचा कुठे सत्कार व्हावा, त्याची एक ओळख निर्माण व्हावी हा या मागचा उद्देश. असे असले तरी तो सफल होताना दिसत नाही. मंगळवारी कृषी दिन असताना यंदा निसर्गाची साथ मिळत नसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचे वास्तव आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी याकरिता शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जात आहे. त्याकरिता मोठा निधी खर्च केला जातो. शेतकऱ्यांकरिता असलेल्या या योजनांचा लाभ त्यांना कमी तर इतरांना अधिक झाल्याचे आजपर्यंत समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या भल्याकरिता असलेल्या योजना राबविताना त्या जर अधिकाऱ्यांनी योग्य रित्या राबविल्या तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. मग शेतकऱ्यांची ओळख निर्माण करण्याकरिता शासनाला कृषी दिनाचीही गरज भासणार नाही अशा प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात गत वर्षासह यंदाचे वर्षही शेतकऱ्यांकरिता संकटाचे ठरत आहे. गत वर्षी आलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी आणले. डोळ्यातले पाणी डोळ्यात लपवून शेतकरी नव्या हंगामाकरिता सज्ज झाला; मात्र निसर्गाच्या लहरी पणाचा फटका त्याला पुन्हा बसला. यंदा पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांनी डोळ्यात दडवून ठेवलेले अश्रू पुन्हा बाहेर निघणे सुरू झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत त्याच्या डोळ्यातील पाणी आता वाहू लागले आहे. नेहमी शेतीचा हंगाम साधण्याच्या दिवसात येत असलेला कृषी दिन यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेल्या पाण्याच्या साक्षीनेच साजरा होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे यंदाचा कृषी दिन शेतकऱ्यांना काय देवून जाईल अशी चर्चा आहे. या कृषी दिनी शासनाने शेतकऱ्यांनाकरिता काहीतरी विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)
पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By admin | Published: July 01, 2014 1:38 AM