आॅनलाईन लोकमतरोहणा : जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही. गिट्टी उखडली असल्याने येथून वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणे कठीण झाले आहे. आदिवासी बहुल भागाला जोडणाºया या रस्त्याची झालेली दैनावस्था पाहता याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष नाही काय, असा प्रश्न उपस्थित होतो.बोथलीसह परिसरातील गावात जाण्यासाठी जंगल परिसर आणि घाटातून जावे लागते. एक किलोमीटर अंतराचा रस्ता वाहन चालविण्या योग्य आहे. मात्र उर्वरीत रस्ता अत्यंत खराब आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी केलेली नाही. या रस्त्यावरील उखडलेली गिट्टी, ठिकटिकाणी पडलेले खड्डे, रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्या आणि घाटाचे वळण पाहता वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. त्यामुळे हा रस्ता रहदारीकरिता धोकादायक ठरत आहे.पांजरा येथून बोथली पुढे रोहणा येथे हा रस्ता जातो. दररोज शेतकरी, शेतमजुर कामासाठी तर विद्यार्थी शाळेसाठी या रस्त्याने आवागमन करतात. पांजरापासून घाटापर्यंतचा रस्ता बांधण्यात आला आहे. मात्र पांजरा (घाट) ते बोथली हा किलोमीटरचा अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याची डागडुजी का केली नाही असा प्रश्न शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, गावकरी उपस्थित करतात.रस्त्याची गिट्टी उखडली असल्याने येथून वाहने घसरतात. रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजुला खोल दऱ्या आहेत. अशात एखादे वाहन दरीत पडण्याचा धोका आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. महाराष्ट्र शासन रस्ते मजबुतीला प्राधान्य देत असताना हा रस्ता अजुनही दुर्लक्षीत असल्याने ग्रामस्थ रोष व्यक्त करतात.प्रवासी त्रस्तया मार्गाने प्रवास करताना सायकलचालक, विद्यार्थी घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या दैयनीय अवस्थेमुळे वाहन पंक्चर होणे, वाहन घसरणे या घटना नित्याच्याच झाल्या आहे. या भागातील पंचायत समिती सदस्या माया नायसे यांनी रस्ता बांधकामाकरिता आमदार, पालकमंत्री, बांधकाम विभाग, जि.प. प्रशासन यांच्याकडे वारंवार मागणी केली. अद्याप या मागणीकडे लक्ष दिले नसल्याने बोथली व परिसरातील ग्रामस्थांना यातनामय प्रवास करावा लागतो.
पांजरा-बोथली रस्त्याला डागडुजीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 10:13 PM
जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही.
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : गिट्टी उखडली