अल्लीपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर येथील ग्राम न्यायालयाला ग्रामसचिव कार्यालयाची जागा ग्रामपंचायत प्रशासनाने उपलब्ध करुन दिली. यामुळे जागेचा प्रश्न मिटला असला तरी येथील न्यायालयाचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम आहे.अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ४२ गावातील समस्या यासह किरकोळ गुन्हे यांची दखल या न्यायालयामार्फत घेण्यात येणार आहे. तत्सम गुन्ह्याचे न्यायदानाचे कार्य येथूनच होणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे. या उद्देशाने येथे ग्रामन्यायालया देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र अनेक दिवसांपासून येथील जागेचा प्रश्न कायम होता. त्यामुळे न्यायालयाच्या कामाला सुरूवात करण्यात अडचण येत होती. ग्रामपंचायत प्रशासनाने याकरिता जागा उपलब्ध करून दिली. यातील चेंबर, फर्निचरचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात अद्याप काय अडसर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. न्यायाकरिता नागरिकांना तालुक्याचे स्थळ गाठावे लागते. परिसरातील ग्रामस्थांना ग्रामन्यायालयाची प्रतीक्षा आहे.(वार्ताहर)
ग्राम न्यायालयाची प्रतीक्षा कायम
By admin | Published: July 16, 2015 12:09 AM