लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : रेड झोनमध्ये असलेल्या पंचाळा गावात उन्हाळा सुरू होताच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना सकाळपासून पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागते. आताच ही अवस्था असल्याने पूढे टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.डोंगर माथ्यावर वसलेल्या पंचाळा गावाच्या सभोवताल काळे पाषाण आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने दुष्काळाची स्थिती आहे. येथील शेती खडकाळ तथा कोरडवाहू आहे. गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गावात हनुमान मंदिरासमोर १०० वर्षांपासून असलेल्या विहिरीतून पाणी भरण्याची सोय होती; पण ती विहीर कोरडी पडली असून दुसरीकडून विहीर पुनर्भरण केले जात आहे. बैलबंडीने ड्रमद्वारे पाणी आणावे लागते. सकाळी महिला-पुरूष विहिरीतून पाणी काढून साठवण करतात.शासनाने राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गावोगावी पाण्याची टाकी, पाईपलाईन, विहिरींचे बांधकाम केले; पण यापासून पंचाळा गाव अद्यापही वंचित राहिले आहे. यामुळे या गावाला त्वरित पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी सरपंच श्रीराम नेहारे यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.पोरगव्हाणसह सात गावे तहानलेलीडोंगरमाथ्यावर व डार्क झोनमधील पोरगव्हाण, किन्ही, मोई, बांबर्डा, बोरखेडी, थार, चामला ही गावेही पाणीटंचाईमुळे तहानलेली आहे. या गावांत बैलबंडीने पाणी आणावे लागते. शासनाच्या कायमस्वरुपी उपाययोजना गरजेच्या आहे. गुरांना स्थलांतरित करावे लागत आहे. दूध, दही, ताक, तुप या पदार्थाचे उत्पादन येथे होते. त्यासाठी मुबलक पाणी पाहिजे. अन्यथा गुरे टिकविणे शक्य नाही. यामुळे शेतकरी गुरे विकताना दिसतात.
७०० लोकांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 10:49 PM