वर्धा : अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी जलदगतीने तपास करून डॉ. रेखा कदम यांना मदत करणाऱ्या दोन परिचारिकांनादेखील गुरुवारी अटक केली आहे. इतकेच नव्हे, तर रुग्णालय परिसरामागे असलेल्या गोबरगॅस खड्ड्यांत ११ मानवी लहान कवट्या आणि ५४ हाडं सापडल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता याप्रकरणातील आरोपी संख्या पाच झाली आहे.
संगीता काळे (३८) आणि पूनम दशरथ दाहट (४५) असे अटक केलेल्या परिचारिकांची नावे असून, दोघींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केल्याची माहिती आहे. डॉ. रेखा कदम हिने ३० हजार रुपयांत बेकायदेशीर गर्भपात केल्याचे उघडकीस आल्यानंतर आर्वी पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला. डॉ. रेखा कदमसह अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना अटक केली. आता पुन्हा दाेन परिचारिकांना अटक केली आहे.
पोलिसांनी रुग्णालयामागे असलेल्या बायोगॅस खड्ड्यातून उपपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत पाटील व दोन शासकीय पंच अल्पवयीन मुलीची आई, डॉ. नीरज कदम यांच्या उपस्थितीत हाडांचे अवशेष आणि मानवी कवट्यांसह इतर बाबी जप्त केल्या. त्या फोरीनसिक लॅब येथे डीएनए तपासणीला पाठविण्यात आल्या असल्याची माहिती आहे.
रुग्णालयाच्या संचालिकेला घेतले ताब्यात
आर्वी येथील कदम हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शैलेजा कदम यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी ज्योत्स्ना गिरी यांनी दिली.
तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती
गर्भपात प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणात आणखी काहींना ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली असून, हे प्रकरण पुढे काय वळण घेते याकडे आता लक्ष लागले आहे.
पोलीस अधीक्षकांनी केली रुग्णालयाची पाहणी
पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांनी गुरुवारी आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये जात पाहणी केली. यावेळी बायोगॅसचा चेंबर ज्यात कवट्या व हाडे सापडली होती त्या भागाची पाहणी करीत परिसरातील विहिरीची पाहणी केली. तसेच या रुग्णालयाला सील लावण्याचीही शक्यता असल्याची माहिती पुढे आली आहे.
कार्यवाहीचा अहवाल तत्काळ सादर करा : चाकणकर
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना आर्वी येथील कदम हॉस्पिटमध्ये जी घटना उघडकीस आली ही बाब अतिशय धक्कादायक आणि डॉक्टरी पेशाला, तसेच माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेचा सखोल तपास करून आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याबाबतची चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाकडे सादर करावा, अशा सूचना त्यांनी पाठविलेल्या पत्रातून दिल्या आहेत.