वर्धा : आर्वी येथे उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात आणि भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य पद्धतीने केला जात असला तरी या प्रकरणात आरोग्य विभागाची भूमिका संशयास्पदच आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आरोग्य विभागातील कोण अधिकारी दोषी आहे, याचा शोध घेणे गरजेचे असून, आरोग्य विभागातील दोषींचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण आरोग्यमंत्री, तसेच गृहमंत्र्यांकडे रेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पीसीपी एनडीटी मंडळाच्या अशासकीय सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
डॉ. मिरगे पुढे म्हणाल्या, ज्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला तिला सुरुवातीला तिच्या कुटुंबीयांनी डॉ. गुल्हाणे यांच्याकडे उपचारासाठी नेले होते. तेथे तपासणीअंती अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे पुढे आले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिला डॉ. कदम यांच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणातील आरोपी असलेल्या महिला प्रसूती तज्ज्ञाच्या सासूच्या नावाने बारा आठवड्यांपर्यंतचे गर्भपात करण्याची परवानगी आहे. आरोपी महिला प्रसूतीतज्ज्ञासह तिच्या पतीच्या नावाने सोनोग्राफीची मशीन आहे. प्रत्येक तीन महिन्यात सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्राला अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती योग्य आहे की नाही याची शहानिशा करणे क्रमप्राप्त आहे; परंतु जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या कार्यकाळात या ठिकाणी अधिकाऱ्यांची भेट झाली काय, याबाबतचे रजिस्टरच गहाळ असल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची भूमिका संशयास्पद असून, यातील वास्तव उघड करण्यासाठी आणि दोषींचा शोध घेण्यासाठी एसआयटी चौकशीची गरज असून, तशी मागणी आपण गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहे. चौकशी समितीत वर्धा जिल्ह्याबाहेरील एक बडा पोलीस विभागातील अधिकारी, दोन डॉक्टर आणि एक वकील यांचा समावेश राहावा यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे डॉ. मिरगे यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयातील औषध खासगी रुग्णालयात कसे
गर्भपात केंद्र आणि डॉक्टरांची मान्यता रद्द करण्याची तरतूद पोस्को व पीसीपीएनडीटी, तसेच एमटीबीमध्ये आहे. गर्भपातासाठी वापरण्यात येणारे मिजोप्राॅस्ट हे शासकीय रुग्णालयातील औषध डॉ. कदम यांच्या रुग्णालयात आले कसे हा सध्या संशोधनाचा विषय असून, त्याचा लवकरात लवकर उलगडा होणे गरजेचे आहे. हे एसआयटी चौकशीअंतीच पुढे येऊ शकते, असेही यावेळी डॉ. मिरगे यांनी स्पष्ट केले.