महेश सायखेडे
वर्धा : आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात - भ्रूण हत्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सोमवारी सहा सदस्यीय अभ्यास गट समिती गठीत केली आहे. नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी, सहाय्यक संचालक डॉ. दिगंबर कानगुले, राज्य पीसीपीएनडीटीच्या अशासकीय सदस्य डॉ. आशा मिरगे, यु. एन. एफ. पी. ए. सल्लागार डॉ. आसाराम खाडे, यु. एन. एफ. पी. ए.च्या सल्लागार ॲड. वर्षा देशपांडे यांचा या अभ्यास गट समितीत समावेश आहे. कदम हॉस्पिटलमध्ये झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल ही समिती थेट आरोग्य विभागाच्या संचालकांना सादर करणार आहे.
मंगळवारी गाठणार आर्वीआरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी गठीत केलेली अभ्यास गट समिती मंगळवार, १८ जानेवारीला आर्वी येथे पोहोचणार आहे. या गटातील सहाही सदस्य कदम हॉस्पिटलमध्ये गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान यंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित २००३चे उल्लंघन झाले आहे काय, यासह वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ सुधारित २०२१चे उल्लंघन झाले आहे काय, याबाबतचा सखोल अभ्यास करून समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक यांनी आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहा सदस्यीय अभ्यास गट समिती नेमली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी आपण राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना केली होती. त्यानंतर ही समिती गठीत करण्यात आली आहे.
- डॉ. आशा मिरगे, सदस्य, पीसीपीएनडीटी, महाराष्ट्र राज्य.