महेश सायखेडे
वर्धा : राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या, तर जनसामान्यांची भंबेरी उडविणाऱ्या आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात-भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास पोलीस विभागाकडून केला जात असला, तरी या प्रकरणाची सविस्तर माहिती आरोग्य विभागातील बडे अधिकारी घटनास्थळाला भेट देऊन जाणून घेत आहेत.
मागील ३३ महिन्यांत आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाला, गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल १ हजार २२० ‘मिजोप्राॅस्ट’ टॅबलेटचा पुरवठा झाला. विशेष म्हणजे ज्या शासकीय रुग्णालयाला या औषधाचा पुरवठा झाला, त्याच रुग्णालयात या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉ. रेखा कदम यांचे पती डॉ. निरज कुमारसिंग कदम हे कंत्राटी डॉक्टर म्हणून सेवा देतात. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील ‘मिजोप्राॅस्ट’चा वापर कदम हॉस्पिटलमध्ये तर होत नव्हता ना? असा प्रश्न सध्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना सतावत असून, त्या दिशेने अधिक माहिती आरोग्य यंत्रणेतील अधिकारी घेत आहेत.
आर्वी रुग्णालयाला तपासावा लागेल ‘मिजोप्रॉस्ट’चा साठा
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून १ जून २०२१ला ५०० तर १३ डिसेंबर २०२१ रोजी ‘मिजोप्रॉस्ट’च्या ३०० टॅबलेटचा पुरवठा आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाला करण्यात आला. या औषधांची एक्सपायरी फेब्रुवारी २०२३ असून, यापैकी किती टॅबलेटचा वापर रुग्णांसाठी करण्यात आला आणि सद्य:स्थितीत किती टॅबलेट शिल्लक आहेत, काही टॅबलेट गहाळ, तर झाल्या नाहीत ना, याची शहानिशा आता आर्वी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला करावी लागणार आहे.
अमरावती कनेक्शन?
आर्वी येथील बहुतांश रुग्ण थेट अमरावती येथे रेफर होतात. त्यामुळे आर्वी येथील अनेक खासगी डॉक्टरांचे अमरावती जिल्ह्यातील डॉक्टरांसोबत घनिष्ट संबंध आहेत. इतकेच नव्हे, तर अमरावती येथील रहिवासी असलेले तथा आरोग्य विभागाच्या अकोला येथील माजी उपसंचालकांचा आर्वी येथे खासगी दवाखाना आहे. त्यांच्यासोबत आणि अमरावतीच्या माजी पालकमंत्र्यांशी डॉ. कदम यांचे चांगले संबंध असल्याने आर्वीच्या कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात प्रकरणाचे धागे अमरावतीशी तर जुळत नाहीत ना, अशी चर्चा सध्या वर्धा जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात रंगत आहे.
ठेवावा लागतोय वेगळा रेकॉर्ड
गर्भपातासाठी वापरण्यात येणारे ‘मिजोप्राॅस्ट’ हे औषध सर्वसामान्य नागरिकांना मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळत नाही. प्रसूतीतज्ज्ञांनी अधिकृत चिठ्ठीवर लिहून दिल्यावरच विक्रेते हे औषध रुग्णासाठी देतात; पण विक्री झाल्यावर ते औषध कुणाला दिले, कुठल्या डॉक्टरने सजेस्ट केले होते, याची वेगळी माहिती विक्रेत्यांना एका रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवणे क्रमप्राप्त आहे. तर प्रसूती तज्ज्ञांनी स्वत: हे औषध रुग्णांसाठी खरेदी केले असेल तर त्यांनाही या औषधाचा रेकॉर्ड ठेवावा लागतो.