चैतन्य जोशी
वर्धा :आर्वी येथील गर्भपात प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत असतानाच आता आर्वीच्या कदम नर्सिंग होम नोंदणीच्या नूतनीकरणाची प्रक्रिया तब्बल १० वर्षांपासून झालेली नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. याप्रकरणात आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दहा वर्षांपासून कदम रुग्णालयाचे नूतनीकरण का झाले नाही, याबाबत चांगलेच फटकारले असून लेखी स्वरूपात उत्तर मागितले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
आर्वी येथील डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांच्यावर अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याच्या आरोपानंतर रुग्णालयाने राज्याच्या आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पत्राच्या आधारे पोलीस यंत्रणा कदम रुग्णालयातील गर्भपात प्रकरणाच्या तपासाची दिशा पुढे सरकवित आहेत. आर्वी पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्याकडून बॉम्बे नर्सिंग होम कायद्यांतर्गत माहिती मागविली होती. त्यात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने २०१० मध्ये कदम नर्सिंग होमच्या नोंदणीचे नूतनीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. बाॅम्बे नर्सिंग होम कायद्याच्या कलम ५ मध्ये दर तीन वर्षांनी नूतनीकरण करणे अनिवार्य असल्याचे नमूद आहे. मात्र, तसे झाले नसल्याचे दिसून आले.
२१ मार्च २०२२ रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आर्वी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, २०१० ते २०२० या कालावधीत कदम नर्सिंग होमच्या नोंदणीचे नूतनीकरण झालेले नसल्याची धक्कादायक माहिती दिल्याने नोंदणीचे नूतनीकरण का करण्यात आले नाही, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यावर काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
कारवाई का करण्यात येऊ नये?
जर नर्सिंग होमच्या नोंदणीचे नूतनीकरण झालेले नसेल तर त्याची तपासणी करण्याची जबाबदारी पीसीपीएनडीटी कमिटी, जिल्हा व तहसील समितीची होती. मात्र, दोन्ही अधिकाऱ्यांचे तपासणीकडे दुर्लक्ष झाले. नोंदणीचे नूतनीकरण न करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून नोंदणी तपासणाऱ्यांवरही कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, मागील दहा वर्षांपासून कदम नर्सिंग होम नूतनीकरणाविना सुरू होते. अशा परिस्थितीत आर्वीचे वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई का करण्यात आली नाही. हा प्रश्न आहे. मात्र, आजपर्यंत वरिष्ठ स्तरावरुन जिल्हा शल्यचिकित्सक आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून वरिष्ठांनी कोठलाही जाब विचारला नसल्याची माहिती आहे.
यासंपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून लेखी स्वरुपात उत्तर मागविण्यात आले आहे. याप्रकरणात जो कुणी दोषी आढळून येईल, त्याच्यावर नक्कीच कारवाई केल्या जाणार आहे.
- संजय जयस्वाल, आरोग्य उपसंचालक.