Wardha Assembly Constituency : वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांना मारहाण करण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे. नितेश कराळे हे सोशल मीडियावर कराळे गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत. नितेश कराळे हे स्पर्धा परीक्षेच्या विषयांच्या अभ्यासाची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून देत असतात. विधानसभा निवडणुकीत नितेश कराळे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत होते. अशातच त्यांना मारहाण झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
वर्ध्याच्या उमरी मेघे या गावात नितेश कराळे यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीनंतर नितेश कराळे हे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह सावंगी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. नितेश कराळे हे आपल्या घरी येत असतानाच त्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्याच दरम्यान, तिथल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं. त्यानंतर उमरी मेघेचे उपसरपंच कोसे यांनी त्यांना मारहाण केला. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मारहाणीनंतर भाजप उमेदवार पंकज भोयर आणि काँग्रेस उमेदावर शेखर शेंडे हे दोघेही आमनेसामने आले होते. यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
"मी एकही शब्द बोललो नाही. मुख्य रस्त्यावर समोरासमोर दोन्ही पक्षाचे बुथ लागले होते. त्यानंतर गुंड प्रवृत्तीच्या आणि पंकज भोयर यांचा समर्थक असलेल्या सचिन खोसे यांनी मारहाण केली. खोसेंवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सरळ मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी रस्त्याने जात असतानाच त्यांनी मला मारहाण केली. भाजपचे लोक अशी अरेरावी करत आहेत," असं नितेश कराळे यांनी म्हटलं आहे. यावेळी कराळे यांनी पंकज भोयर यांच्यावर आरोप केले.
नितेश बाळकृष्ण कराळे असं कराळे मास्तराचं पूर्ण नाव आहे. वर्धा तालुक्याच्या मांडवा येथील शेतकरी कुटुंबातील नितेश कराळे यांनी बीएससी बीएड पर्यंत शिक्षण घेतलं आहे. वऱ्हाडी बोलीवर चांगली पकड असल्याने त्यांनी आपल्या शैलीत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी फोनिक्स अकादमी सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात विद्यार्थींनी त्यांच्याकडे प्रवेश घेतला होता. मात्र कोरोनामुळे शिकवण्या बंद झाल्या. मात्र त्यानंतर त्यांनी यू-ट्यूब, झूम व्हिडीओद्वारे विद्यार्थ्यांना शिकवणे सुरु ठेवलं होतं.
२०२० मध्ये नितेश कराळे हे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिले होते. या निवडणुकीध्ये कराळे गुरूजींना ८५०० मते मिळाली होती. त्यानंतर नितेश कराळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रचार करण्यास सुरुवात केली होती. विधानसभा निवडणुकीतही कराळे मास्तरांनी अनेक सभा गाजवून सोडल्या आहेत.