वर्धा - वर्ध्यातील पुलगावातील लष्कर तळावर जुनी स्फोटकं निकामी करताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका जवानाचाही समावेश आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी (20 नोव्हेंबर) पहाटे 5.30वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटातील जखमींवर मोफत उपचार होतील, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसंच स्फोट नेमका कोणत्या कारणांमुळे झाला यामागील कारण शोधण्यासाठी, उच्चस्तरिय समिती स्थापन करुन चौकशी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. शिवाय, याप्रकरणाचा आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ जुनी स्फोटकं निकामी करण्याच्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. स्फोटकं निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जबलपूर येथील दारुगोळा भांडारातील माल येथे निकामी करण्यासाठी आणले होते. स्फोटकं निकामी करण्याचे काम कंत्राटदाराकडून करुन घेतले जाते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, अशी माहिती आहे.