लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पुलगाव येथील दारुगोळा भांडारात मंगळवारी पहाटे झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. या अपघातात सहा जण ठार झाले असून ११ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.बॉम्ब हाताळताना झाला स्फोटया दारुगोळा भांडारात बॉम्ब निकामी करण्याच्या मैदानात मुदतबाह्य बॉम्ब नेहमीच निकामी करण्यात येतात. येथे जबलपूरहून आलेले बॉम्ब निकामी करत असताना एका मजुराच्या हातून बॉम्बची पेटी खाली पडली आणि त्याचा स्फोट जाला. या स्फोटामुळे इतर पेट्यांमधील बॉम्बचाही स्फोट होऊन अपघाताची तीव्रता वाढली. मंगळवारी पहाटे शेकडो बॉम्ब भरून आलेल्या व्हॅनमधून या पेट्या उतरवण्याचे काम सुरू झाले. या पेट्या घेऊन मजूर जमिनीत खणलेल्या खोल खंदकापर्यंत नेत होते. अशातच एका मजुराच्या हातून पेटी सुटली व पुढील अनर्थ घडला.बॉम्ब निकामी करण्यासाटी सोनेगाव आबाजी, केळापूर आणि जामणी या तीन गावांचा सुमारे १ हजार एकराचा भूभाग अधिग्रहित करण्यात आला आहे. या कामासाठी बोलावण्यात आलेले मजूर हे पुलगाव येथील एका अनधिकृत ठेकेदारासाठी काम करत असल्याचे समजते. बॉम्ब फोडण्यात येणाऱ्या आरक्षित जागेतील दहा खंदक हे या ठेकेदाराच्या ताब्यात आहेत. बॉम्ब फुटल्यानंतर यामधून निघालेल्या लाखो रुपयांच्या तांबे व पितळाच्या मालापैकी काही नाममात्र माल खंदकात काम करणाºया लोकांना देऊन हा गोरखधंदा सुरू असल्याचे सांगितले जाते.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. तसेच माहिती घेतली.मृतांमध्ये विलास पचारे (४०), नारायण पचारे (५५) सव केळापूर, प्रवीण मुंजेवार (२५) केळापूर, उदयपीर सिंग (२७) जबलपूर, प्रभाकर वानखेडे (४०) सोनेगाव, संजयकुमार भोवते (२३) केळापूर यांचा समावेश आहे.
काय आहे घटना?वर्धा जिल्ह्यात पुलगाव येथील देवळी तालुक्यात सोनगावबाई गावाजवळ असलेल्या लष्करी तळावर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण स्फोट झाले. बॉम्ब निकामी करताना हातातून पेटी खाली पडल्याने हे स्फोट झाल्याचे समजते. यात आतापर्यंत सहाजण ठार झाले असून ११ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.