प्रभाकर शहाकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोनेगाव (आबाजी) परिसरात घडलेल्या घटनेने शहर व परिसर हादरून गेला. दारूगोळा भांडारातील बॉम्ब निकामी करीत असताना नजीकच्या सोनेगाव आबाजी परिसरातील सरंक्षित क्षेत्रात बॉम्ब स्फोट होवून पाच मजूर व एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर ११ कंत्राटी कामगार जखमी झाले. मृतकांमध्ये तीन तरूण सोनेगाव येथील तर दोन केळापूर येथील आहेत. या दोन्ही गावावर शोककळा पसरली असून नातेवाईक प्रचंड आक्रोश करीत होते. या घटनेत जबलपूर खमेरिया येथील उदयवीरसिंग (३७) यांचाही मृत्यू झाला. ते जबलपूर येथील दारूगोळा भांडारातून येथे आले होते. अशी माहिती मिळाली आहे.सोनेगाव व केळापूर तसेच घटना स्थळाची पाहणी केली असता. दोन्ही गावात दारूगोळा भांडार प्रशासन व शंकर चांडक या कंत्राटदाराविषयी प्रचंड रोष दिसून आला. या बॉम्ब स्फोटामुळे भांडार परिसरातील ग्रामस्थ दहशतीत आहे.राज्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांचे सोनेगाव (आबाजी) हे मुळगाव असून घटनेच वृत्त कळताच घटनास्थळी भेट देवून केळापूर, सोनेगाव येथील मृतक परिवाराचे सांत्वन केले. तसेच त्यांनी सावंगी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, देवळी न.प.च्या गटनेत्या शोभा रामदास तडस यांनी देखील घटनास्थळी भेट देवून गावकऱ्यांना दिलासा दिला.या घटनेनंतर या दोन्ही गावात अनेकांच्या चुलीही पेटल्या नव्हत्या. गावात भेट दिली असता मृतकाचे कुटुंबियांचा आक्रोश दिसून आला. तर जखमींच्या कुटुंबियांच्या डोळ्याचे अश्रु थांबता थांबेना अशी अवस्था होती. या घटनेविषयी सोनेगाव येथील जखमी विक्रम ठाकरे या २० वर्षीय तरूणाने लोकमतला माहिती देताना सांगितले की, कालबाह्य झालेले स्फोटके निकामी करण्यासाठी अकुशल कामगारांचा वापर करण्यात येतो. व स्फोटके निकामी करण्याचा कंत्राट खासगीरित्या देण्यात येतो. सदर कंत्राट हा शंकर चांडक व बंधु यांना देण्यात आला. असून दारूगोळा भांडारातील कालबाह्य स्फोटके लष्करी तळापासून तर स्फोटक विनाशक स्थळापर्यंत पोहचविणे व खंदकांत नष्ट करण्याची संपूर्ण प्रक्रिया अकुशल कामगारांकडून रोजंदारीवर करण्यात येत होती. मंगळवारी सकाळी ही प्रक्रिया करीत असताना सोनेगाव येथील नारायण पचारे यांचे हातातून बॉम्बची पेटी पडून मोठा स्फोट झाला. या स्फोटात नारायणसह ६ जणांचा बळी गेला. निकामी करण्याच्या प्रक्रियेत या निकामी स्फोटकातून निघणारे धातंूचे अवशेष गोळा करण्याचे कामसुद्धा संबंधीत कंत्राटदार कमी मोबदल्यात करून घेत होता, अशी माहिती विक्रम ठाकरे यांनी दिली. या कामापोटी या कामगारांना अल्प मजूरी दिल्या जात असल्याची खंत मृतक व जखमींच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.या घटनेतील बॉम्ब स्फोटातील दाहकता एवढी तीव्र होती की, मृतकाच्या देहाच्या चिधंड्या उडाल्या. सदर घटना स्थळे हे पुलगाव शहरापासून १० ते १२ कि़मी. अंतरावर सोनेगाव- केळापूर या गावांच्या मधे आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दारूगोळा भांडाराने प्रतिबंधीत क्षेत्राचा हक्क सांगत पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी, ऐसगाव, मुरदगाव या पाच गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी होती. परंतु पूनर्वसन झाले नाही.केळापूर येथील मृतक राजकुमार भोवते यांना एक भाऊ व आई असून भाऊ हा पोलीस पाटील आहे. आई संगीताला मुलगा परत येण्याची आस असून घटनेनंतर ती घायमोकळून रडत होती. सोनेगाव येथील प्रभाकर वानखेडे यांची पत्नी नमिता ही प्रतिक व प्रतीक्षा या मुलांसह शोकाकूल अवस्थेत होती. घरचा कमावता माणूस गेल्याने मुलाबाळाच्या भविष्याची चिंता तिने दुखदायकपणे बोलून दाखविली.सोनेगाव येथील ग्रामस्थ किशोर राऊत म्हणाले की, पोटासाठी गावकरी ही कामे करतात. परंतु त्यांना मिळणाºया अल्प मोबदला तर त्यांच्या जीवावर कंत्राटदार व अधिकारी मजा करतात जी कामे कुशल कामगारांकडून करावी. ती या रोजंदारीवर असणाºया मजूरांकडून केल्या जात असल्याचे सांगितले. तर प्रतिबंधीत क्षेत्र असलेल्या घटनास्थळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते.
अकुशल कंत्राटदाराला मिळाले कामसरंक्षण विभागाच्या केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या लष्करी तळात सरंक्षण विभागाची कोट्यावधी रुपयांची अति संवेदनशिल स्फोटक असताना कालबाह्य झालेली स्फोटके निकामी करण्याचा कंत्राट स्फोटक तज्ज्ञांचा समावेश असलेल्या कंत्राटदाराला न देता रोजंदारी तत्वावर अकुशल कामगारांचा समावेश असलेल्या कंत्राटदाराला देण्यात आल्यामुळे सैनिकी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले.यापूर्वी सुद्धा दारूगोळा भांडारात अशा प्रकारच्या अनेक घटनांतून कित्येकांना आपले जीव गमवावे लागले तर दारूगोळाचे कोट्याविधी रुपयांचे वित्तहाणी व प्राणीहाणी होवूनही संबंधीत प्रशासन उदासीन का? असा प्रश्न जनमाणनसात केल्या जात आहे.