नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विध्वंसक स्फोटके नष्ट करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत कंत्राटदार चांडक बंधूने कालबाह्य ठरवली. ही सुरक्षित पद्धत त्याने अधिक जास्त घातक बनविली. त्यांच्या या घातक कृतीकडे पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भांडारातील संबंधित मंडळींनीही दुर्लक्ष केले. त्याचमुळे २० नोव्हेंबरला सकाळी सहा जणांचे बळी घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचा आधार कायमचा हिसकावून घेण्यारा भीषण बॉम्बस्फोट घडल्याचे पुढे आले आहे. लष्करी तळावर झालेल्या या भीषण बॉम्बस्फोटाचे हादरे वेगवेगळ्या पद्धतीने संरक्षण मंत्रालय, गृहमंत्रालयाला बसले आहेत. त्यामुळे या जीवघेण्या स्फोटाच्या चौकशीची चके्र गतिमान झाली आहेत.लोकमत प्रतिनिधीने या संबंधाने घटनास्थळी जाऊन विध्वंसक स्फोटके नष्ट करण्याची प्रक्रिया समजावून घेण्याचे प्रयत्न केले. गेल्या २५ वर्षांपासून या प्रक्रियेत सहभागी असलेल्या दोन जणांनी त्याबाबत माहिती देताना ही महत्त्वपूर्ण तेवढीच घातक प्रक्रिया कंत्राटदाराने कशी जास्त घातक बनविली, त्याची संतापजनक माहिती दिली. आम्ही जेव्हा आतमध्ये असतो तेव्हा आम्हाला जीवाचा भरवसा राहत नाही, असेही त्यांनी कापºया सुरात आपले नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.या दोघांच्या माहितीनुसार, दारुगोळा भांडारातील कालबाह्य स्फोटके नष्ट करण्याची प्रक्रिया पहाटेपासून सुरू होते. पहाटे ५ वाजता संबंधित अधिकारी, जवान कालबाह्य स्फोटके डेपोतूनकाढून वाहनात ठेवतात. लष्कराच्या व्हॅन स्फोटके घेऊन मैदानात पोहचतात. तर, स्फोटके नष्ट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणारे मजूर आपापल्या घरून आरक्षित मैदानात पोहचतात. वाहनातून कालबाह्य झालेले बॉम्बगोळे, बंदुक ीच्या गोळ्या, ग्रेनेड, लॅन्डमाईन्स आदीच्या पेट्या खाली उतरवून मजूर त्या खंदकात पुरण्यासाठी नेतात. ते नष्ट करण्यासाठी डिटोनेटर्स, टीएनटी चादर, कार्टेज वायर असते. स्फोटके खंदकात ठेवल्यानंतर त्याला कार्टेज वायर जोडून त्यावर पी, टीएनटी चादरीचा स्लॅब घातला जातो. त्याला सेफ्टी फ्युज आणि टायमर लावल्यानंतर त्याभोवती वाळू-मातीच्या पोत्याचे घट्ट आवरण घातले जाते.तत्पूर्वी वायरची वात लांबवर नेऊन तिला विशिष्ट लायटरने आग लावली जाते. स्फोटापुर्वी धोक्याचा इशारा देण्यासाठी लाल लाईट परिसरातून आकाशाकडे उडवला जातो आणि बाहेर काढलेल्या वायरला आग लावताच स्फोट घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्यक्ती आधीच सुरू ठेवलेल्या जिप्सीत बसून सुसाट वेगाने ठराविक अंतरावरच्या सुरक्षित जागेत पोहचतात. तेथून वायरची वात व्यवस्थित जळत आहे की नाही, हे दुर्बिणीने बघितले जाते.
संकेत देण्यासाठी हिरवा लाईटस्फोट घडविल्यानंतर कुणालाही दुखापत झाली नाही, याचे संकेत देण्यासाठी आकाशाच्या दिशेने हिरवा लाईट (रॉकेट) सोडला जातो. ही आधीची शास्त्रशुद्ध स्फोटके नष्ट करण्याची पद्धत आहे.मात्र, कंत्राटदाराने ही पद्धत बासणात गुंडाळून ठेवली आहे.