वर्धा : शहरातील स्टेशनफैल परिसरात संशयास्पदस्थितीत फिरत असलेल्या अट्टल दुकानफोड्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ३ हजार ८८० रुपयांची रोकड हस्तगत करून वर्ध्यातील दुकानफोडीच्या गुन्ह्याची उकल केली.
नरेश समाधान भांगे (४२) रा. अनकवाडी, ता. भातकुली, जि. अमरावती असे आरोपीचे नाव आहे. नटवरलाल श्रीराम रिनवा रा. वर्धा यांच्या पटेल चौकात असलेल्या तेलाच्या दुकानात चोरट्याने चोरी करीत २१ हजार ५०० रुपयांची रोकड व एक डीव्हीआर बॉक्स असा ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल झाली होती.
स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस समांतर तपास करीत असताना आरोपी नरेश भांगे हा स्टेशनफैल परिसरात फिरत असल्याचे समजले. पोलिसांनी त्यास अटक करून हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात निरंजन वरभे, गजानन लामसे, रणजित काकडे, यशवंत गोल्हर, अभिजित वाघमारे, रितेश शर्मा, राजू जयसिंगपुरे, गोपाल बावणकर, प्रदीप वाघ, अमोल ढोबाळे यांनी केली.
आरोपीविरुद्ध ३० गुन्हे दाखल
आरोपी नरेश भांगे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध अमरावती, अकोला, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत खून, घरफोडी, हत्यार कायदा, रात्री दरम्यान संशयास्पद स्थितीत वावरणे, दुचाकी चोरी करणे आदी विविध गंभीर असे तब्बल ३० गुन्हे दाखल असून सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहे.