चैतन्य जाेशी
वर्धा : देवळीनजीकच्या सेलसुरा येथे झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील सात भावी डॉक्टरांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृतक विद्यार्थी हे नेमके कुठे गेले होते, कोठून आले होते, याबाबत अनेकांकडून तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, ‘लोकमत’ने ‘त्या’ ढाब्याचा शोध लावून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्या सातही भावी डॉक्टरांचा अखेरचा घास अन् अखेरचा प्रवास ‘माँ की रसोई’ या ढाब्यापासून झाल्याचे निष्पन्न झाले.
मृत पवन शक्ती या तरुणाचा २४ रोजी वाढदिवस असल्याने आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले, नीरज चौहान, नितेश सिंग, विवेक नंदन, पत्युश सिंग, शुभम जैस्वाल हे सात भावी डॉक्टर नागपूर ते तुळजापूर रस्त्यावर असलेल्या इसापूरनजीक ‘माॅं की रसोई’ ढाब्यावर गेले होते. सायंकाळी ७.१० मिनिटांनी त्यांची (ओडी २३, बी १११७) क्रमांकाची एक्सयुव्ही कार ढाबा परिसरात पोहोचली. त्यांच्या हातात केकही होता. ते हॉटेलच्या लगतच असलेल्या गार्डनमध्ये बसले होते. केक कापून त्यांनी पवनचा वाढदिवस सेलिब्रेट केला आणि स्नॅक्सची ऑर्डर देत त्याचा आस्वाद घेतला. अन् रात्री ११ वाजून ३८ मिनीट ४९ सेकंदाने परत कारमध्ये बसून तेथून निघून गेले. वर्ध्याला परत जात असताना अवघ्या १० मिनिटाचे अंतर कापण्यापूर्वीच १२.१५ मिनिटांनी सातही भावी डॉक्टरांवर काळाने घाला घातला.
११.२७ वाजता केले ‘गुगल पे’
मृतक सातही विद्यार्थी सुमारे ७.३० ते ११.३० वाजेपर्यंत ढाब्यावर बसून होते. त्यांनी २ किलो मांसाहाराचा आस्वाद घेतला. त्यानंतर ११.२७ वाजता मृत पवन शक्तीने ‘गुगल पे’द्वारा ढाबा मालक अतुल मानकर यांना २,७८० रुपयांचे बिल ऑनलाईन ट्रान्सफर करुन ते ११.३८ वाजता तेथून कारने निघून गेले होते.
सर्व मृतदेह दिले नातेवाईकांच्या स्वाधीन
मंगळवारी रात्रीपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात सहाही विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन सुरु होते. आविष्कार रहांगडाले याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. मात्र, इतर सहा विद्यार्थ्यांचे मृतदेह सावंगी येथील शवागृहात ठेवण्यात आले होते. बुधवारी सहाही विद्यार्थ्यांचे मृतदेह रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले होते.
चार दिवसानंतरही अपघाताची धग कायम
सात डॉक्टरांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या दुर्देवी घटनेला चार दिवस उलटून गेल्यावरही त्या भीषण अपघाताची धग कायम होती. नागपूर ते तुळजापूर मार्गावरील सेलसुरानजीक अपघातस्थळी नागरिक गर्दी करु लागले आहेत. महिला व पुरुषांसह लहानग्यांनादेखील अपघाताची भीषणता समजून येत होती.
मृतक पवन अन् बहीण एकाच वर्गात
बिहार राज्यातील गया येथील मृतक पवन शक्ती आणि त्याची बहीण सुमन शक्ती हे दोघेही सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. पवनला सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बहिणीने गोड घास भरवला अन् त्याच रात्री पवनच्या मृत्यूची माहिती कानी पडताच सुमनवर दुखाचा डोंगर कोसळला. सात जिवलग मित्र अचानक निघून गेल्याने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही घटना धक्कादायक होती.
सोशल मीडियाद्वारे मुलाला वाहिली श्रद्धांजली
आविष्कार हा आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा होता. गोंदिया जिल्ह्यातील त्याचे मूळ गाव खामरी येथे डॉक्टर नसल्याने लहानपणापासूनच आविष्कारला डॉक्टर बनविण्याची आई-वडिलांची इच्छा होती. एनआरआय कोट्यातून त्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुक या सोशल मीडियावर ‘आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं’ अशी कविता सादर करुन श्रद्धांजली वाहिली.
एअरबॅग फुटून आली होती रस्त्यावर
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चारचाकी वाहनात बसणाऱ्यांच्या समोर एअरबॅग लावण्यात येतात. भावी डॉक्टरांच्या भीषण अपघातात एअरबॅग उघडल्या. मात्र, त्याचा फायदा सातही मृतक तरुणांना झालेला नव्हता. अपघात इतका भीषण होता की, एअरबॅग फुटून रस्त्यावर पडली होती.
‘अतिवेग’ ठरला त्यांचा काळ
सातही भावी डॉक्टर हे कारने ढाब्यावर गेले असता, ती कार नितेश सिंग चालवत होता. ढाब्यावरुन वर्ध्याला परत येतानाही त्यानेच कार चालवली. कार १५०च्या भरधाव वेगात असल्यानेच त्यांच्यावर काळ ओढविल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.