लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाजपच्या कार्यालयात प्रदेश सचिवपदी राजेश बकाने यांची नियुक्ती झाल्याने रविवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याने रामनगर पोलिसांनी हा कार्यक्रम थांबविण्याची सूचना केली. याप्रकरणी रविवारी भाजपच्या १३ पदाधिकाऱ्यांसह ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी भाजपचे वर्धा येथील आमदार डॉ. पंकज भोयर, सचिव राजेश बकाने यांच्यासह वर्धा पालिकेच्या आठ नगरसेवकांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीत राजेश बकाने यांची महासचिवपदी निवड झाल्याने धंतोली येथील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे ३०० ते ४०० कार्यकर्ते उपस्थित झाल्याने याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भाजप कार्यालय गाठून गर्दी पांगविली.
कोरोनाकाळात जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी १६ पदाधिकाऱ्यांसह ३५ कार्यकर्त्यांविरुद्ध रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सखोल चौकशीअंती सोमवारी या प्रकरणात आमदार डॉ. पंकज भोयर, राजेश बकाने, नगरपालिकेचे बांधकाम सभापती प्रदीप ठाकरे, वंदना भुते, श्रेया देशमुख, सुरेश आहुजा, नौशाद शेख, कैलास राखडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रामनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश इटकल यांनी सांगितले. यापूर्वी संचारबंदीच्या काळात नागरिकांना अन्नधान्य वाटपासाठी घराजवळ बोलावून गर्दी केल्याने आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले, नवनियुक्त सचिव राजेश बकाणे यांच्या सत्कारासाठी पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपण तेथे गेलो होतो. यापूर्वीही येथे जिल्हाध्यक्ष व खासदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाले आहेत.