वर्धा : बसने प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध महिलेच्या पर्समधील रोकड चोरुन नेणाऱ्या चोरट्या महिलेला शहर पोलिसांनी बसस्थानक परिसरातून अटक केली. ही कारवाई गुन्हे शाेध पथकाने केली असून पोलिसांनी चोरीतील ६,४०० रुपये हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला.
आम्रपाली बंडु वानखेडे (५८ रा. रामटेके नगर नागपूर) असे अटक केलेल्या चोरट्या महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, मंदा रामदास बारेकर रा. मांडवगड या १ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास वर्ध्याला किराणा आणण्यासाठी आली होती. साहित्य खरेदी करुन उर्वरित ६,४०० रुपये पर्समध्ये ठेवले होते. बसस्थानकावरुन गोजी बसमध्ये बसून मांडवगड येथे जाण्यासाठी बसत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लुगडे कापून त्यात ठेवलेले ६,४०० रुपये चोरुन नेले होते. २ रोजी त्यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तपास चक्रे फिरवून तपासणी केली असता बसस्थानकावर संशयीत महिला बसून दिसली. महिला पोलिसांनी तसेच कर्मचाऱ्यांनी तिची विचारपूस केली असता तिने उडवा उडवीची उत्तरे दिले. पोलिसी हिसका दाखवताच तिने चोरीची कबूली देत चोरलेले ६,४०० रुपयांची रक्कम परत दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या निर्देशात संजय पंचभाई, राजेश डाळ, श्याम सलामे, अलका राठोड यांनी केली