महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : काळी बुरशी अशी ओळख असलेल्या म्युकरमायकोसिस हा आजार जिल्ह्यातील नागरिकांना कासवगीनेच आपल्या कवेत घेत मृत्यूच्या दारापर्यंत नेत आहे. या आजाराने आतापर्यंत तब्बल आठ व्यक्तीचा बळी घेतला असून जिल्ह्यात म्युकरचा मृत्यू दर तब्बल ६.०६ टक्के असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकच दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी आठ व्यक्तींचा या आजाराने बळी घेतला असून ११९ रुग्णांनी त्यावर विजय मिळविला आहे. तर सध्या दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच रुग्णालयात उपचार सुरू असताना तीन रुग्णांनी स्वत:च रुग्णालयातून सुटी घेतली आहे.
बाधितांत पुरुष सर्वाधिक
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यात १०६ पुरुष तर २६ महिलांचा समावेश आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.
रिकव्हरी दर ९०.१५ टक्के
जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराने आठ व्यक्तींचा बळी घेतला असला तरी आतापर्यंत ११९ रुग्णांनी त्यावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा रिकव्हरी दर ९०.१५ टक्के असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत १३२ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी आठ व्यक्तींचा म्युकरमुळे मृत्यू झाला असून ११९ रुग्णांनी या आजारावर विजय मिळविला आहे. वेळीच उपचार म्युकरमुक्तीसाठी महत्त्वाचे असून कुठल्याही व्यक्तीला लक्षणे असल्यास त्याने नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.