लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्ह्यात स्वयंसहायता महिला गटांना स्वयंरोजगारासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यात येतो. वर्धा जिल्हा हा महाराष्ट्रातील स्वयंसहायता गटाला बँक कर्ज देणारा प्रथम जिल्हा ठरला आहे. मुंबई येथे जिल्हास्तरीय बँकर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड यांना सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यात उमेद अभियानांतर्गत बँका इंटेन्सीव पद्धतीने स्वयंसहायता गटांकरिता काम करीत आहेत. आर्थिक समावेशन अंतर्गत २०१६-१७ च्या आर्थिक वर्षात दिलेल्या उद्दिष्टांनुसार एकूण जिल्ह्याला ३०३७ गटांसाठी व ३ हजार ८५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकेने २९९८ गटांना ४२६० कोटीचे अर्ज देऊन बँकेद्वारे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. स्वयंसहायता गटाला आर्थिक पुरवठा करणारा वर्धा पहिला ठरला आहे. गरीबातील गरीब कुटुंबापर्यंत बँकेच्या आर्थिक सेवा पोहोचणे तसेच जिल्ह्यातील स्वयंसहायता गटाला आर्थिक पुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याने चांगली कामगिरी केली, असे मत कोहाड यांनी व्यक्त केले. प्रकल्प सहसंचालक प्रमोद पवार, नाबार्डच्या डॉ. स्रेहल बन्सोड, देवकुमार कांबळे, उमेदचे राजेंद्र बरडे, सिद्धार्थ भोतमांगे, मनीष कावडे, विलास झोटींग, वर्षा कोहळे, हेमंत काकडे, उमेदचे कर्मचारी यांच्याद्वारे बँक कर्ज वितरणाकरिता सहकार्य करण्यात आले.
बचतगटांना कर्जपुरवठा करण्यात वर्धा जिल्हा राज्यात पहिला
By admin | Published: July 02, 2017 12:45 AM