लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सोयाबीन आणि कपाशी पीक हातचे गेल्याने यंदा तूर पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. पण मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने तूर पिकाची शेंग भरत असतानाच आता अळीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. उंटावरून शेळ्या हाकलणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेत शिवारात येत हवालदील शेतकऱ्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.
तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता चिकणी भागातील वृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. महागड्या किटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने उभे पीक उपटून टाकावे काय असा विचार सध्या या भागातील शेतकरी करीत आहेत. सप्टेंबर आणि अक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे तसेच बोगस बियाण्यांमुळे या भागातील सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचा यंदाच्या वर्षी चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यातून कसे बसे सावरत नाही तर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. या संकटातून सावरण्यापूर्वीच आता तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीने अटॅक केला आहे. महागड्या किटकनाशकांची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने कुंभकर्णी झोपेचे सोंग घेणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर येत त्यांना वेळीच मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.उत्पादनात घट येण्याची शक्यतापरिसरातील काही शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात. तर काही शेतकरी तुरीची सलग लागवड करतात. यंदाच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी समाधानकारक उत्पन्न होईल या आशेवर तूर पिकाची लागवड केली. पण अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा सोयाबीनची सवनगणी कराचे कामच पडले नाही. उभ्या पिकात जनावरे चराईसाठी सोडावी लागली. तर गुलाबी बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात बऱ्यापैकी घट आली आहे. या दोन्ही संकटातून बाहेर निघण्यापूर्वीच आता तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही कुणी बांधावर पोहोचलेले नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य सल्ला द्यावा.- मोरेश्वर घोडे, शेतकरी, चिकणी.