लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना प्रकोपामुळे राज्यभरात संचारबंदी असून जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहे. याही परिस्थितीत दारुविक्रीला चांगलेच उधाण आले आहे. छुप्या मार्गाने दारु विक्री होत असताना गावठी दारुविक्रीचा व्यवसाय या कालावधीत चांगलाच बहरला आहे. अनेकांनी या काळात अवैधरित्या चढ्या दराने दारुविक्री करुन माया जमविली आहे.संचारबंदीमुळे दारुची दुकानेही बंद करण्यात आली आहे. तरीही मद्यपी दारुचा शोध घेत सहज दारु मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. दारुविक्रेतही चढ्या दराने पाहिजे ती दारु उपलब्ध करुन देत आहे. मात्र दामदुप्पट दारु पिणे अनेकांना शक्य होत नसल्याने अनेकांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. गावातील गावठी दारुच्या भट्ट्या आणि पारधी बेड्यावर मद्यपींची गर्दी वाढत आहे. देशीविदेशी दारु ऐवजी तळीमारांनी आता हातभट्टीच्या दारुला पसंती दिल्याने गावठी दारुची मागणी वाढली आहे. त्यामुळे संचारबंदी झुगारुन ग्रामीण भागात व जंगल परिसरात अवैधरित्या दारुच्या भट्टया लावल्या आहे.एकीकडे पोलीस प्रशासन संचारबंदीची अंमल बजावणी करण्यात व्यस्त असताना दारुविक्रेत्यांनी आपला व्यवसाय वाढविला आहे. यातूनच अनेकांनी चांगलीच कमाई केली असून दिवसरात्र गावठी दारु काढण्यासोबत गावागावात माल पोहोचविण्याचेही काम सुरु आहे. त्यामुळे पोलिसांनी या अवैध दारुविक्रीकडेही आपला मोर्चा वळविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटककारंजा(घा.) : संचारबंदीमुळे सर्व दुकान बंद करण्यात आले आहे. त्यात दारुविक्रीची दुकानेही बंद असल्याने गावठी दारुचा महापूर सुरु आहे.दररोज लाखो लिटर गावठी दारुची विक्री होत आहे. त्यामुळे पोलिसांनी गावठी दारुविक्रेत्यांवर लगाम लावण्यासाठी नाकेबंदी सुरु केली. यादरम्यान उमरी या गावातून एम.एच.३२ ए.डी.८६३२ क्रमांकाच्या दुचाकीने निकेश ज्ञानदेव भोसले व अजित फुलारसिंग पवार रा. पारधीबेडा, भिवापूर हे दोघेही ५० लिटर गावठी मोहा दारु घेत जात असताना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी या दोघांनाही अटक करुन त्यांच्याकडून दुचाकी व दारुसाठा जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राजेंद्र शेटे, निलेश मुंढे, सुरजसिंग बावरी, गोविंद हादवे, सरपंच घनश्याम चोपडे, पोलीस पाटील देविदास ढोबाळे यांनी केली.
दोन लाखाच्या गावठी दारुचे पोलिसांकडून वॉशआऊटकोरोनाचे संकट दूर सारण्यासाठी जिल्हा प्रशासन झटत आहे.पोलीस प्रशासनही दिवसरात्र संचारबंदीच्या अंमलबजावणीकरिता रस्त्यावर उतरले आहे. याचाच फायदा घेत वर्धा शहरातील पुलफैल, आनंदनगर आणि पांढरकवडा पारधी बेडा या परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारुची निर्मिती सुरु होती. येथून मोठ्या प्रमाणात इतर ठिकाणी दारुचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी शोध मोहीम राबवून या तिन्ही ठिकाणच्या १२ चालू दारु भट्टया उद्धवस्त केल्या. मोहा सडवा, मोहा सडवा रसायन, दारू सडवा भरून असलेले ड्रम, गाळलेली दारू भरून असलेल्या कॅन व दारू तयार करण्याकरीता लागणारे साहित्य असा एकूण २ लाख ५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, मिलिंद रामटेक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कारवाईमुळे दारुविक्रेत्यांमध्ये धडकी भरली असून ही कारवाई अशीच सुरु ठेवण्याची गरज आहे.सध्या संचारबंदीचा काळ आहे. अनेक गावात दारुविके्रते चोरुन लपून दारु विक्री करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे गावात गर्दी वाढत आहे. याबाबत पोलीस प्रशासनाशी चर्चा करुन दारुविक्रेते आणि दारु पिणारे या दोघांवरही कारवाई केली जाईल.- सुनील केदार, पालकमंत्री