लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी गुरुवारी सुरु असताना १९ व्या फेरीपर्यंत तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आला. त्यातील दोन मशीन क्लोज बटन तर एक मशीनची बैटरी कमी झाल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दुजोरा दिला जात असून बिघडलेल्या ईव्हीएममधील मतांची सर्वात शेवटी मोजणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चार विधानसभा मतदार संघातून ४७ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. आर्वी व वर्ध्यात प्रत्येकी १०, हिंगणघाट १३ तर देवळी मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात आहेत.
वर्धा शहरात अनेक मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरविली, तर वर्धा शहरालगत असलेल्या ग्रामपंचायत भागात चांगले मतदान झाले. या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जातो, त्याचा विजय निश्चित आहे. मात्र, शहरातील अनेक हिंदीभाषिक भागात नोटाही जोरदार चालला आहे. तसेच शहरातील परंपरागत काँग्रेस मतदार असलेल्या भागात मतदान जोरात झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा कौल ग्रामीण भागातील मतदानाच्या भरवशावरच ठरणार आहे. या मतदार संघात जातीय समीकरण अत्यंत प्रभावी राहिले आहे.