आर्वी (वर्धा) : तालुक्यात सात ग्रामपंचायतसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार दादाराव केचे व काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या गटांत चुरशीचीच लढत झाली. सोमवारी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून, सात पैकी चार ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला. तर एका ग्रामपंचायतीत कुणाची सत्ता आली याबाबत संभ्रम कायम होता.
आर्वी तालुक्यात झालेल्या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चार काँग्रेस गटाचे सरपंच निवडणूक आले, तर तीन भाजपचे उमेदवार निवडून आले. मात्र, यात अहिरवडा ग्रामपंचायतमध्ये सात अनपोज उमेदवार होते. पण आता सरपंच पदाचा उमेदवार भाजपचा की काँग्रेसचा, यावर घमासान सुरू झाले आहे. या ठिकाणी भाजपचे दोन गट पडले होते. यातील एका गटाने काँग्रेस गटाकडे साकडे घातले होते. त्यामुळे दोन गटांतील एक उमेदवार सरपंच पदाचा निवडून आला. आता नेमका तो सरपंच कोणाकडे जाणार हे येणारा काळच सांगणार आहे. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
मांडलात काँग्रेसची सत्ता
मांडला ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस समर्थित गटाचे सर्व सदस्य विजयी झालेत. विजयी सरपंच म्हणून सुरेंद्र धुर्वे यांच्या गळ्यात माळ पडली. तर मिर्झापूर नेरी ग्रामपंचायत पुन्हा पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेली. तेथे सरपंच म्हणून बाळा सोनटक्के हे विजयी झालेत.
हैबतपूर येथे भाजपला मिळाली केवळ एक जागा
हैबतपुर येथे सहा जागेवर काँग्रेस, तर एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी झाला. सरपंचपदी काँग्रेसचे सचिन पाटील हे निवडून आले. तर सर्कसपूर येथे पाच काँग्रेस, तर दोन जागा भाजपला मिळाल्या. तेथे गजानन हनवते हे सरपंच म्हणून निवडून आले. पिंपरी भुतडा ( पु.) ग्रामपंचायतीत चार जागा काँग्रेस, तर तीन जागा भाजपला मिळाल्या. तेथे सरपंच म्हणून रज्जाक अली हे विजयी झाले.
जाम ग्रामपंचायतीत भाजपला मिळाल्या तीन जागा
जाम पुनर्वसन येथे काँग्रेस समर्थित गटाला चार, तर भाजप समर्थित गटाला तीन जागांवर विजय मिळाला. येथे सरपंच म्हणून राजकुमार मनोहरे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. सर्कसपूरची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, या ठिकाणी काँग्रेसने विजय मिळविला.
तीन टेबलवर झाली मतमोजणी
मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी काम पाहिले. तीन टेबलांवरून सोमवारी मतमोजणी पूर्ण झाली.