महेश सायखेडे
वर्धा : अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील विविध कागदपत्रांची सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने बारकाईने पाहणी केली असता एका साध्या कागदावर गर्भाशय क्युरेटिंग (डी. अँड सी.) च्या तब्बल ४४ संशयास्पद नोंदी आढळल्या.
पुष्पा, पूजा, वैशाली, नंदा, लीला अशी नावे लिहिलेल्या या कागदावरच त्या स्त्रीलिंगी नावांसमोर अनुक्रमे (९), (६), (९), (११), (९) असे कोड लिहिलेले होते. हे कोड म्हणजे या महिलांनी आणलेले ग्राहक की त्यांच्याकडून अवैध गर्भपातापोटी हजारांत किंवा लाखांत स्वीकारली जाणारी रक्कम हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे अभ्यासगट समितीच्या निदर्शनास आलेल्या ‘पुष्पा (९), पूजा (६), वैशाली (९), नंदा (११), लीला (९)’ या सांकेतिक अंकांचा उलगडा होण्याची गरज आहे. तसे मतही सहा सदस्यीय अभ्यासगट समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
३० वर्षांत कमावली कोट्यवधींची माया
आर्वी येथील कदम नर्सिंग होममध्ये सात बेड आढळून आल्यानंतर अभ्यासगट समितीतील तज्ज्ञांच्या भुवयाच उंचावल्या. त्यानंतर या तज्ज्ञांनी आणखी बारकाईने पाहणी केली असता कदम हॉस्पिटलमध्ये या वैद्यकीय गर्भपात केंद्रास वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ अंतर्गत १८ नोव्हेंबर १९९१ रोजी मान्यता दिली असल्याचे प्रमाणपत्र आढळून आले; पण त्याबाबतचे कुठलेही दस्ताऐवज जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात आढळून आले नाहीत. असे असले तरी अवैध गर्भपात प्रकरणातील आराेपी असलेल्या कदम डॉक्टर दाम्पत्याने मागील ३० वर्षांच्या काळात गौडबंगाल करूनच कोटींची माया जमविल्याचे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
औषधसाठा गुलदस्त्यातच...
अवैध गर्भपात प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधून प्रामुख्याने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सप्लायचे बॅच क्रमांक एचआयओसी २०३७ चे ६० तर बॅच क्रमांक एचआयओसी २०४० चे ३०, अशी एकूण ९० ऑक्सिटोसिन इंजेक्शन, ७१ हजार ७६४ गोळ्यांचा समावेश असलेल्या माला-एन गर्भनिरोधक औषधीचे मुदतबाह्य २३ बॉक्स जप्त केले आहेत. शासकीय औषधांचा इतका मोठा औषधसाठा कदम हॉस्पिटलमध्ये आला कसा, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.