वर्धा : देशाला हादरा बसणाऱ्या आर्वी येथील 'कदम' रुग्णालयातील गर्भपात प्रकरणाचा तपास आता दोन भागात आला आहे. अल्पवयीन पीडितेच्या गर्भपाताचा तपास आर्वी येथील ठाणेदारांकडे सोपविण्यात आला आहे. तर, उपविभागीय पोलीस अधिकारी हे खासगी रुग्णालयात सापडलेल्या शासकीय औषधांचा तपास करीत आहे.
आर्वी येथील कदम रुग्णालयात झालेल्या गर्भपात प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सातत्याने सुरू आहे. मात्र, पोलिसांना इतर विभागाची मदत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 'कदम' परिसरात रुग्णालयाच्या असलेल्या मागील बायोगॅस चेंबरमध्ये १२ मानवी कवट्या आणि ५४ हाडं सापडली होती. ही हाडं मानवीय आहे की अन्य कुणाची, हाडांचे वय आणि लिंग याबाबतची माहिती मागविण्यात आली होती. मात्र, २० दिवस उलटूनही नागपूर येथील फॉरेन्सिक विभागाने याचे उत्तर दिलेले नाही. 'कदम' यांच्या खासगी रुग्णालयात सापडलेल्या शासकीय औषधांची तपासणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके करत आहेत. वैद्यकीय अधीक्षकांच्या तक्रारीच्या आधारे हा तपास एसडीपीओंकडे सोपविला आहे.
उपविभागीय पोलीस चमूने जिल्हा अधिकाऱ्यांच्या शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांना बुधवारी २ रोजी पत्र पाठविले होते. यापूर्वीही ठाणेदार पिदुरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना विविध मुद्यांबाबत माहिती मागितली होती. मात्र, आरोग्य विभागाने अद्याप कुठलेही उत्तर दिलेले नाही.
पोलिसांनी मागितली ही माहिती
आर्वी पोलिसांनी शल्यचिकित्सकांना पाठविलेल्या पत्रात कदम रुग्णालयात मिळालेल्या शासकीय औषधांचे बेंस नंबरच्या औषधी जिल्ह्यात कोणत्या शासकीय रुग्णालयात वितरीत केल्या आहेत. तसेच आदी विविध १३ प्रश्न पत्रातून विचारण्यात आले आहेत. औषधांच्या तपासात अडचणी येत आहे. कारण डॉ रेखा कदम, डॉ. नीरज कदम हे कारागृहात आहेत. कदम दाम्पत्यासोबतही पोलीस विचारपूस करणार आहेत. अन्न व औषध विभागालाही पोलिसांनी पत्र पाठवून यापूर्वी त्यांनी कदम रुग्णालयात कोणती तपासणी केली आहे, असे पत्रातून विचारले आहे.
फॉरेन्सिक रिपोर्टसाठी प्रतीक्षाच
नागपूर येथील फॉरेन्सिक कार्यालयातील विशेषजा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते सुटीवर आहेत. त्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्ट येण्यासाठी पोलिसांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.