वर्धा : आर्वीतील गर्भपात प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्वी पोलिसांना कदम हॉस्पिटलमधील तीन कपाटांतून ९७ लाख ४२ हजार ७७२ रुपयांची रोकड आढळली. पोलिसांना नोटा मोजण्यासाठी ९ तास लागले. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही संपूर्ण रोख पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने माहिती दिल्याने आयकर विभाग सोमवारी याप्रकरणी चौकशी करण्याची शक्यता आहे.
कदम रुग्णालयात १३ वर्षीय मुलीचा अवैधरीत्या गर्भपात करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार पीडित मुलीची आई व मावशीने पोलिसांत दाखल केल्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा कदमसह दोन परिचारिकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ‘लोकमत’ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्याने पोलीस, आरोग्य यंत्रणेने या प्रकरणातील अधिक बाबींवर आपले लक्ष केंद्रित केले. दरम्यानच्या काळात शासकीय रुग्णालयातील औषधींचा साठाही कदम रुग्णालयात आढळून आला. त्यानंतर डॉ. नीरज कदमला उपजिल्हा रुग्णालयाच्या कंत्राटी सेवेतून निलंबित करण्यात आले. लागलीच पोलिसांनी त्याला अटक केली.
तो अटकेत असताना याप्रकरणी डॉ. कुमारसिंह कदम, डॉ. शैलजा कदम यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, प्रकृती बिघडल्याने ते दोघे सध्या नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्याकडून चाव्या आणून शनिवारी पोलिसांनी या बंद खोलीतील ३ लोखंडी कपाटांची तपासणी केली. आर्वीतील बँकांमधून नोटा माेजणीची मशीन आणून रोकड मोजण्यात आली, अशी माहिती आर्वीचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिली.
आयकर विभागाकडून आज चौकशी?
नऊ तास चाललेल्या मोजणीनंतर रोख रकमेसंदर्भात पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना माहिती दिली. आयकर विभागाला लगेच सूचना केली. कदमच्या घरात लोखंडी कपाटामध्ये लोखंडी पेटीत हा पैसा लाल, पांढऱ्या रंगाच्या कापडांमध्ये दडवून ठेवण्यात आला होता. आयकर विभाग आरोपी कदमकडून या पैशाबाबत माहिती घेईल, त्यानंतरच ही एवढी मोठी रोख रक्कम कशाची, याचा खुलासा होईल.