महेश सायखेडे
वर्धा : बायो मेडिकल वेस्ट हे प्राण्यांसह मनुष्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम करणारे असल्याने त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी, असे प्रदूषण नियंत्रण कायद्यात नमूद करण्यात आले आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकृत एजन्सीही नेमण्यात आली आहे. परंतु, प्रदूषण नियंत्रण कायद्याला वाकुल्या दाखवत आर्वी येथील कदम हॉस्पिटल प्रशासन बायो मेडिकल वेस्टची स्वत:च विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यासाठी अधिकृत करण्यात आलेल्या नागपूर येथील एजन्सीकडे १० ऑगस्ट २०२१ला आर्वीच्या कदम हॉस्पिटलने बायो मेडिकल वेस्ट देण्यासाठी रीतसर नोंदणी केली. मात्र, मागील सहा महिन्यात अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वीच्या कदम हॉस्पिटलने नागपूरच्या या अधिकृत एजन्सीला त्यांच्याकडील बायो मेडिकल वेस्ट दिले नसल्याचे सांगण्यात आले.
सुपर हायजेनिक डिस्पोझल अधिकृत एजन्सी
वर्धा जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयातील बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागपूर येथील सुपर हायजेनिक डिस्पोझल या एजन्सीची नेमणूक केली आहे. या एजन्सीकडे वर्धा जिल्ह्यातील सुमारे १८३ रुग्णालयांनी बायो मेडिकल वेस्ट देण्यासाठी रीतसर नोंदणी केली आहे.
एक दिवसाआड होतेय उचल
नोंदणी केलेल्या वर्धा जिल्ह्यातील हॉस्पिटल आणि रुग्णालयातून नागपूर येथील अधिकृत एजन्सीद्वारे एक दिवसाआड बायो मेडिकल वेस्टची उचल केली जाते. असे असले तरी मागील सहा महिन्यांच्या काळात अधिकृत एजन्सीचा प्रतिनिधी गेल्यावरही आर्वी येथील कदम हॉस्पिटलने त्यांच्याकडील बायो मेडिकल वेस्ट या एजन्सीला दिले नसल्याचे सांगण्यात आले.
तालुकानिहाय रुग्णालयांची नोंदणी
हिंगणघाट : ४७
वर्धा : ९७
आर्वी : ०७
कारंजा : ०४
समुद्रपूर : ०३
आष्टी : ०१
देवळी : २०
सेलू : ०४
वर्धा जिल्ह्यातील सुमारे १८३ रुग्णालयांनी आपल्या एजन्सीकडे बायो मेडिकल वेस्ट देण्यासाठी नोंदणी केली आहे. या नोंदणी केलेल्या रुग्णालयांतून आमचा प्रतिनिधी एक दिवसाआड बायो मेडिकल वेस्टची उचल करतो. परंतु, १० ऑगस्ट २०२१ पासून आर्वी येथील कदम हॉस्पिटलने मागील सहा महिन्यात एकदाही आमच्या प्रतिनिधीला त्यांच्याकडील बायो मेडिकल वेस्ट दिले नाही.
- रबी सिंग, सुपर हायजेनिक डिस्पोझल, नागपूर.