चैतन्य जोशी
वर्धा : आर्वी येथील कदम रुग्णालयात सापडलेल्या शासकीय औषधाच्या भांडारप्रकरणाच्या तपासास पोलिसांनी गती दिली आहे. त्यातच उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिका शोभा राठोड यांनी रजिस्टरमध्ये खोडतोड करून अपहार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणात त्यांना आर्वी पोलिसांनी अटक केली. आरोपी परिचारिकेला न्यायालयात हजर केले असता तिची कारागृहात रवानगी केल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली.
आर्वी येथील कदम रुग्णालयात अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात १५ जानेवारी रोजीला कदम रुग्णालयातून माला डी इनच्या ७१ हजार ७६४ मुदतबाह्य औषधी, तसेच ऑक्सिटोसीनची ९० इंजेक्शन व इतर औषधांचा साठा सापडला होता. कदम रुग्णालयात शासकीय औषधांचा साठा सापडल्याने हा साठा आला कोठून? याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली होती. मागील चार महिन्यांपासून आर्वी पाेलिसांनी कसोशीने तपास केला असता अखेर तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना गिरी यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वरिष्ठ परिचारिका शोभा राठोड यांना डॉ. नीरज कदम यांच्या संगनमताने औषधांच्या रजिस्टरमध्ये खोडतोड करून अपहार केल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे तिला कलम ४०९ भादंवि अंतर्गत अटक करण्यात आली.
‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश
डॉ. कदम यांच्या रुग्णालयात शासकीय औषधांचा साठा आढळल्याने पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जात तपासणी केली असता पोलिसांना पाच रजिस्टरमध्ये खोडतोड केल्याचे आढळून आले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले असता पोलिसांनी तपासाला गती दिली. अखेर चार महिन्यांच्या तपासानंतर वरिष्ठ परिचारिका शोभा राठोड यांनी डॉ. नीरज कदम यांच्या सांगण्यावरून खोडतोड केल्याचे तपासात पुढे आल्यानंतर पोलिसांनी परिचारिका शोभा राठोड हिला अटक करून तुरुंगात पाठविले.
आरोग्य विभागाला चपराक
कदम रुग्णालयात मुदतबाह्य औषधसाठा आढळून आल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे यांनी आर्वी पोलिसांत शासकीय औषधांची अफरातफर झाल्याची तक्रार नोंदविली होती. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आर्वी येथे जात ही औषधं शासकीय रुग्णालयातील नसल्याची माहिती प्रसार माध्यमांना देत पोलीस तपासात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. आरोग्य विभागाच्या यू-टर्नमुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिकेनेच शासकीय औषधांचा अपहार केल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याने आराेग्य विभागाला चांगलीच चपराक बसली आहे, हे मात्र तितकेच खरे.