महेश सायखेडे
वर्धा : अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटमधील मनमर्जी कारभारावरील परदाच सध्या ‘लोकमत’ वृत्तमालिकेच्या माध्यमातून उघडत चालला आहे. याच कदम हॉस्पिटलमधील काही दस्ताऐवजाची पाहणी सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने केली असता ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळातील एक-दोन नव्हे तर तब्बल ४४ डी ॲन्ड सीची माहिती एका साध्या कागदावर लिहिलेली आढळून आली आहे. विशेष म्हणजे ही माहिती विहित नमुन्यात नोंद घेणे क्रमप्राप्त आहे. पण आर्वीच्या कदम डॉक्टर दाम्पत्याने नियमांना बगल देण्यातच धन्यता मानल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनंतर उजेडात आली आहे.
आर्वी पोलिसांनी अवैध गर्भपात प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३१२, ३१३ व ३१५ अन्वये गुन्ह्याची नोंद घेतली आहे. याच गुन्ह्याच्या तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी कदम हॉस्पिटलमधून काही दस्ताऐवज जप्त करीत ते सीलबंद केले. याच ३८ सीलबंद पाकिटांची पाहणी सहा सदस्यीय अभ्यागट समितीने केली. त्यापैकी सात पाकिटांवर त्रुटीबाबत नमूद केल्याचे आढळले आहे.
कोड पद्धतीने साध्या कागदावर नोंदी
सहा सदस्यीय अभ्यासगट समितीला कदम हॉस्पिटलमधील दस्ताऐवजाची पाहणी करताना ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळातील तब्बल ४४ डी अँँड सीची नोंद एका साध्या कागदावर आढळून आली आहे. पण या नोंदी घेताना कदम डॉक्टर दाम्पत्याने गैरप्रकार करण्यात सराईत असल्यागतच पुष्पा (९), पूजा (६), वैशाली (९), नंदा (११), लीला (९) अशा नोंदी घेतल्या आहेत. त्यामुळे या कोड पद्धतीने घेतलेल्या नोंदीचे रहस्य उलगडल्यास मोठे भगाडच पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सीएसची तक्रार देण्याकडे पाठच
१८ नोव्हेंबर १९९१ रोजी आर्वी येथील कदम नर्सिंग होमला वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ अंतर्गत मान्यता दिल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे अभ्यासगट समितीला आढळले आहे; पण याच प्रमाणपत्राच्या अनुषंगाने आवश्यक दस्तऐवज जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात नसल्याचे उजेडात आले आहे. हेच दस्तऐवज कुणी गहाळ केले याचा शोध घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी साधी तक्रारही अद्याप पोलिसांत दिलेली नाही. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नच उपस्थित केले जात आहे.
कदम हॉस्पिटलमधील दस्ताऐवजाची पाहणी करताना सहा सदस्यीय अभ्यासगट समितीला ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळातील तब्बल ४४ डी अँँड सीची माहिती एका साध्या कागदावर लिहिलेली आढळून आली. विहित नमुन्यात ही माहिती नोंदविणे गरजेचे असतानाही त्याकडे पाठच दाखविण्यात कदम हॉस्पिटलने धन्यता मानल्याचे माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त माहितीवरून उजेडात आले आहे. ही बाब गंभीर असून, आरोग्य विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांची बदली करून सखोल चौकशी करावी.
- ताराचंद चौबे, ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ता, वर्धा