वर्धा : वन विभागाच्या मालकीच्या झुडपी जंगलातून जेसीबीच्या सहाय्याने अवैध उत्खन्न करून मातीची चोरी केली जात असल्याची माहिती प्राप्त होतच वन विभागाच्या अधिका-यांनी छापा टाकून जेसीबी जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री मौजा साटोडा शिवारात वन विभागाच्या अधिकाºयांनी केली.
मौजा साटोडा शिवारातील सर्वे क्र. १८८ या झुडपी जंगलात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात असल्याची माहिती वर्धा विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या चमुने घटनास्थळ गाठले असता त्यांना जेसीबीच्या सहाय्याने अवैध खोदकाम करताना आढळून आले. अधिकाºयांनी खोदकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची विचारणा केली असता ते न आढळून आल्याने जेसीबी चालक सचिन भाऊराव नेहारे याला ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे १५ लाखांचा एम.एच. ३२ पी. २१५६ क्रमांकाचा जेसीबी जप्त केला. ही कारवाई वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, भाष्कर इंगळे, श्याम कदम, उमेश शिरपुरकर, अरुण कांढलकर आदींनी केली.
विट भट्टीसाठी केले जात होते अवैध उत्खन्न
वन विभागाने जप्त केलेला जेसीबी सुहास पाटील यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने झुडपी जंगलातून मातीची चोरी करून ती जंगलाच्या शेजारी असलेल्या शेतात ठेवून ती विट भट्टीसाठी वापरली जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाºयांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.