वर्धा : जगात कोरोना या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यालाच आळा घालण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिका-यांकडून प्राप्त झालेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून शनिवार आणि रविवारी वर्धा एमआयडीसीतील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. शनिवारी काही अपवाद वगळता येथील सर्व उद्योग बंद होते तर रविवारीही हा बंद पाळण्यात येणार आहे.वर्धा एमआयडीसीमध्ये सुमारे १५० उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये तब्बल ३ हजारांच्या वर कामगार काम करतात. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी वर्धा एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने द्वि-दिवसीय बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योजकांनीही या बंदला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन वर्धा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी केले आहे.आर्किटेक्चर देणार नाही सल्लाकोरोनाला अटकाव घालण्यासाठी आर्किटेक्चरही पुढे आले आहे. आर्किटेक्चर असोसिएशनच्या वतीने शनिवार आणि रविवारी स्वयंस्पूर्तीने बंद पाळण्यात येणार आहे. या दिवसात कुठलाही आर्किटेक्चर बांधकाम स्थळी अथवा त्यांच्या कार्यालयात सल्लामसलत किंवा इतर कोणत्याही कामाासाठी उपलब्ध राहणार नाही, असे असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद पाठक यांनी स्पष्ट केले आहे.
वर्धा एमआयडीसीतील उद्योग राहणार बंद; जिल्हाधिका-यांच्या सूचनेनंतर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 1:54 PM