सुधीर खडसे
वर्धा : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी समुद्रपूर येथील पंचायत समिती कार्यालय वेळ उलटून गेल्यावरही टाळेबंदच होते. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेर ताटकळत उभे राहावे लागले.
सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असतो. या दिवशी सर्व अधिकारी, कर्मचारी जागी मिळतात, असा नागरिकांचा समज आहे. त्यामुळे तालुक्यातून कामािनिमित्त येणाऱ्या नागरिकांची सोमवारी प्रत्येक कार्यालयात गर्दी दिसून येते. मात्र, याला समुद्रपूर येथील पंचायत समिती कार्यालय अपवाद ठरले. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असतानाही आणि कार्यालय उघडण्याची वेळ झाली असतानाही पंचायत समिती कार्यालय कुलूपबंद होते.
अनेक कर्मचारी निश्चित वेळेवर पोहोचले हाेते. तालुक्यातील काही गावांतील नागरिकही आले होते. मात्र, कार्यालयाला टाळे लावल्याचे दिसून आले. निर्धारित वेळेनंतरही जवळपास अर्धा तासपर्यंत ऑफिस कुलूप बंद होते. त्यामुळे आलेले कर्मचारी, नागरिक कार्यालयाबाहेर ताटकळत उभे होते. शासनाने शासकीय कामात अधिकाधिक सुधारणा व्हावी, याकरिता पाच दिवसांचा आठवडा केला. सलग दोन दिवस सुट्या दिल्या आहे. तरीही कामकाजात सुधारणा होताना दिसत नाही. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असूनही दहा वाजून १५ मिनिटांपर्यंत पंचायत समिती कार्यालयाला टाळे लावलेले होते. साधारणत: २५ कर्मचारी कार्यालय उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. परिणामी शासकीय कामकाज उशिरा सुरू झाले. गटविकास अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसून ते स्वतःच ११:०० ते १२:०० वाजेच्या सुमारास येतात, असे सांगितले जाते. त्यामुळे कार्यालय उघडणारे कर्मचारीही उशिरा येतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्यालयातील शिपाई आपत्ती व्यवस्थापनाकरिता तहसील कार्यालयात ड्यूटीवर होते. त्यामुळे पंचायत समिती कार्यालय उशिरा उघडले.रोशनकुमार दुबे,गटविकास अधिकारी, समुद्रपूर.