वर्धा : राज्यातील सर्वांत मोठ्या मुरूम व माती चोरी प्रकरणातील दुसरा आरोपी तथा एम. पी. कन्स्ट्रक्शनचा आशीष दफ्तरी सध्या न्यायालयाच्या आदेशावरून ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे. याच पोलीस कोठडीदरम्यान अधिक पुरावे गोळा करण्यासाठी वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चमूने आरोपीला सोबत घेऊन त्याच्या नागपूर येथील कार्यालय आणि घरी छापा टाकून पाहणी केली.त्यात कुठलाही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला नसला तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना बराच वेळ मिळाल्याने अनेक पुराव्यांवर त्याच्याकडून पांघरूण टाकण्यात आल्याची चर्चा पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी आशीष दफ्तरी याला सोबत घेऊन नागपूर गाठले. त्यानंतर एम. पी. कन्स्ट्रक्शनचे कार्यालय आणि घर असे एकत्र इमारत असलेल्या त्याच्या मालकीच्या घराची झडती घेतली.यादरम्यान काही गोपनीय माहितीही जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. आशीष दफ्तरी याचे बँक खाते जीएसटी थकविल्याने गोठविण्यात आल्याचीही माहिती पोलिसांच्या हाती लागली. परंतु यात काय सत्यता आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत.
वर्धा पोलिसांकडून आशीष दफ्तरीच्या घराची झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 5:17 AM