लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कर्जबाजारी झालेल्या मित्रांनी महेश अजाब श्रीरंग याच्या नेतृत्त्वात कर्जाच्या रक्कमेची परतफेड करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून चक्क वर्धा शहरातील मुथ्थुट फिनकॉर्न गोल्ड लोन फायनांसच्या कार्यालयात दरोडा घालण्याचा कट रचला. या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
हे पाचही आरोपी महेशचे मित्र असून कुशल सरदाराम आगासे याने आपल्या नावा प्रमानेच कुशलतेने कुरीयर बॉयचा रोल निभविल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वर्धा शहरातील मुख्य मार्गावरील मुथ्थुट फिनकॉर्न गोल्ड लोन फायनांसच्या कार्यालयात काही दरोडेखोरांनी दरोडा घालून बंदुकीच्या धाकावर रोखसह सोन्याचा ऐवज चोरून नेला. ही बाब उजेडाच येताच शहर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली.
प्राथमिक चौकशीनंतर अवघ्या सहा तासांत चोरट्यांचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महेश अजाब श्रीरंग (३५) रा. नागपूर व कुशल सरदाराम आगासे (३२), मनिष श्रीरंग घोळवे (३५), जीवन बबन गिरडकर (३६) व कृणाल धर्मपाल शिंदे (३६) चौघे रा. यवतमाळ यांना गुरूवारी सायंकाळी अटक केली. या चोरट्यांकडून पोलिसांनी २०० पाकिटांमधील २ किलो ५५६.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख ९९ हजार १२० रुपये, सहा मोबाईल, एक बनावटी पिस्टल, दोन कार व इतर साहित्य असा एकूण ४ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, प्रभारी पोलीस अधीक्षक राहूल माखनीकर,उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, सलाम कुरेशी, अशोक साबळे, निरंजन वरभे, संताेष दरगुडे, अनिल कांबळे, प्रमोद पिसे, राजेश जयसिंगपुरे, पवन पन्नासे, संघसेन कांबळे, विकास अवचट, अभीजीत वाघमारे, भुषण पुरी, श्रीकांत खडसे, चंद्रकांत बुरंगे आदींनी केली.
ऑडिटनंतर चोरी गेलेल्या मुद्देमालाचा आकडा गसवला
दरोडेखोरांनी नेमका किती मुद्देमाल चोरून नेला याची सुरूवातीला बँकेच्या अधिकाऱ्यांनाही कल्पना नव्हती. पण नंतर पोलिसांच्या आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्र स्थानी ठेवून ऑडिट करण्यात आले. या ऑडिटचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून चोरट्यांनी मुथ्थुट फिनकॉर्न गोल्ड लोन फायनांसच्या कार्यालयातून एकूण ५८२ पाकिटमधील ९ किलो ६० सोने चोरून नेल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी २०० पाकिटमधील २ किलो ५५६.५ ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले आहे.
कुशल औषधी विक्रेताया प्रकरणातील आरोपी जीवन गिरडकर याच्याविरुद्ध यापूर्वी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तर महेश श्रीरंग हा मागील २ वर्षांपासून सोन तारणा कर्जाच्या व्यवसायात काम करतो. विशेष म्हणजे आरोपी कुशल आगासे याचे मेडीकल शॉप होते. पण या व्यवसायात त्याला तोटा सहन करावा लागला होता. अशातच या पाचही आरोपींनी आपल्या डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर कमी करण्यासाठी थेट दरोडा टाकण्याचा कट रचला.
एसपींनी केले ३५ हजारांचे बक्षीस जाहीर
अवघ्या काही तासांत दरोड्यातील आरेापींना हुडकून काढत जेरबंद करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी ३५ हजारांच्या रोख बक्षीस जाहीर केले आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी आज आयोजित पत्रपरिषदेत केली. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी वर्धा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
ठेवीदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता संय्यम बाळगावा. सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत असून कायदेशीर कार्यवाही पूर्ण केल्यावर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यात येईल.- प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक वर्धा.