लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भात वाघांची संख्या वाढल्याने वर्धा जिल्ह्यातील बोर, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व नागपूर जिल्ह्यातील उमरेड नजीकचा कऱ्हाडला या तीन व्याघ्र प्रकल्पांना जोडून व्याघ्र कॉरिडोर निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात बोर अभयारण्य आहे. नागपूर, वर्धा या दोन्ही मार्गाला जोडणारे हे ठिकाण असून राज्यातील ४१ अभयारण्यांमध्ये त्याचा समावेश आहे. या अभयारण्यात वाघांची संख्या बरीच वाढविण्यात आली आहे.आता या अभयारण्यात नागपूर जिल्ह्यातील ६१ चौ. मी. क्षेत्राचाही समावेश करण्यात आला आहे. वाघाशिवाय अन्य प्राणी आणि पक्ष्यांचाही येथे मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. या अभयारण्यात इको टुरिझम झोन सुध्दा निर्माण करणे शक्य आहे. यामध्ये बृहस्पती मंदिराचाही समावेश करण्यात आला आहे. या अभयारण्यात येणाऱ्या नवरगाव गावाचे पुनर्वसन करण्यात आले. या भागात असलेले गवत वाघांच्या प्रजननासाठी अतिशय उपयुक्त असल्याने वाघांचे योग्य पध्दतीने संगोपन व संरक्षण केले जावू शकते, असे वनअधिकाऱ्यांचे मत आहे. शिवाय हे ठिकाणी नागपूर विमानतळापासून अत्यंत जवळचे आहे. वर्धा व नागपूर ही रेल्वे स्थानकेही जवळ आहेत. त्यामुळे या अभयारण्यात पर्यटकांचाही ओढा वाढू शकतो. ही बाब लक्षात घेवून या व्याघ्र प्रकल्पाला कॉरिडोरशी जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी याबाबत पुढाकार घेतला असल्याची माहिती वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. व्याघ्र प्रकल्प कॉरिडोर निर्माण झाल्यास वर्धा जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही चालना मिळेल, असेही ते म्हणाले.चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा, नागपूर असा हा कॉरिडोर तयार केल्यास वर्धा जिल्ह्यातही व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. बोरधरण येथे जलाशय असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने अलीकडेच निधी मंजूर केला आहे. कामालाही लवकरच सुरुवात केली जाणार आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पात १,९६१ प्राण्यांची नोंदयंदाच्या व्याघ्र गणनेत या प्रकल्पात एकूण १ हजार ८६१ प्राणी असल्याची नोंद झाली आहे. यात सहा वाघ, एक बिबट असल्याची नोंद आहे. ओल्ड बोर आणि न्यू बोर अशा दोन भागात विभागलेल्या या प्रकल्पात एकूण १२ वाघ असल्याची माहिती वनविभागाने दिली.