महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्यात १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणी गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. यात वर्धा जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ९७.२८ टक्के काम करून राज्यात अव्वल येण्याचा मान पटकाविला आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील गावागावात ७ हजार ४१९ इतके पाण्याचे स्त्रोत व मालमत्ता आहे. त्यापैकी एकूण ६ हजार ४४२ पाण्याचे स्त्रोत आहेत. यात वर्धा जिल्ह्याने ७ जानेवारीपर्यंत पाण्याच्या ६ हजार २५९ स्त्रोतांच मोबाईल अप्लिकेशनद्वारे मॅपिंग करून नमुने घेण्यात आले आहे. या कामामुळेच वर्धा जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अव्वल राहिला आहे. पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून वैयक्तिक सवयी व सार्वजनिक स्वच्छता, नळ पाणी पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोष, देखभाल व दुरूस्ती या कामांमुळे पाणी दूषित होते. ते दूषित पाणी पिण्यास वापरल्यास नागरिकांना विविध आजार जडतात. नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे या उद्देशानेच पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने घेवून त्याची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. वर्धा जिल्ह्यात हे काम जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ज्ञ गणेश सुरकार व जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक किशोर तराळे यांच्या नेतृत्वात केले जात आहे.६,२५९ पाण्याच्या स्रोताचे घेतले नमुनेमोबाईल अप्लिकेशनद्वारे जिल्ह्यातील ६ हजार ४४२ पाण्याच्या स्त्रोतापैकी ६ हजार २५९ पाण्याच्या स्रोताचे नमुने घेण्यात आले आहेत. वर्धा तालुक्यातील १ हजार ४२० स्त्रोतांपैकी १ हजार ३६७, आर्वी तालुक्यातील ७९२ पैकी ७९२, आष्टी तालुक्यातील ४०८ पैकी ३३८, देवळी तालुक्यातील ७९९ पैकी ७९९, हिंगणघाट तालुक्यातील ८९४ पैकी ८९४, कारंजा तालुक्यातील ४१४ पैकी ३९०, समुद्रपूर तालुक्यातील ८३३ पैकी ८०२ तर सेलू तालुक्यातील ८२२ पाण्याच्या स्रोतापैकी ८२४ स्त्रोतांचे मोबाईल अप्लिकेशन द्वारे नमुने घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मोबाईल अॅपद्वारे पाणी नमुने घेण्यात वर्धा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:33 AM
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्यात १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणी गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला.
ठळक मुद्दे९७.२८ टक्के काम : पाणी गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रम