वर्धा : वर्धा- यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना लोकमत वृतपत्र समूहाचे अध्यक्ष, राज्यसभेचे तत्कालीन खासदार डाॅ. विजय दर्डा यांच्या पाठपुराव्यामुळे या २८४ किमीच्या मार्गाला मंजुरी मिळाली होती. आता या मार्गाच्या विकासाला गती देण्यासाठी हा रेल्वेमार्ग पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट करण्यात आला. या मार्गाचे जानेवारी २०२४ मध्ये उद्घाटन होऊन वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वेगाडी धावणार असल्याचे सूतोवाच रेल्वेच्या सूत्रांनी केले आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर समाविष्ट झाल्याने २०१६नंतर या प्रकल्पाची गती जलद झाली व परिणामी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये रेल्वे गाडीची ट्रायल सुरू होणार असून प्रत्यक्ष वर्धा ते कळंब या सेक्शनचे उद्घाटन जानेवारी २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. प्रकल्पामुळे देवळी शहर व वर्धा जिल्ह्यातील भिडी हे गाव रेल्वेच्या नकाशावर प्रथमच येणार आहे. या कामाबद्दल मी समाधानी असून देवळी येथे एमआयडीसीची मागणी लक्षात घेता मालधक्कादेखील मंजूर केलेला आहे, अशी माहिती वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी ‘लोकमत’ला दिली. वर्धा ते नांदेड हा प्रवास भविष्यात तीन ते चार तासात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाला १६ हजार कोटींपेक्षा अधिक निधी देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
दोन टप्प्यांतील कामांची स्थिती nहा रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यांत आहे. पहिला वर्धा ते यवतमाळ ७८ किमी, तर दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड २०६ किमी आहे. साडेतीन हजार कोटी खर्चून मार्ग पूर्णत्वास जात आहे. nवर्धा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब ४० किमी व कळंब ते यवतमाळ ३८ असे वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले. nयवतमाळ ते नांदेड रेल्वेमार्गाच्या सिंगल लाइनचे काम प्रगतिपथावर असून, मार्गावर १५ मोठे ब्रीज, २९ बोगदे, ५ उड्डाणपुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. या मार्गावर वर्धा ते कळंबपर्यंत ४० किमीच्या रेल्वेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. nदेवळी रेल्वे स्टेशनच्या सुसज्ज वास्तूंचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्लॅटफॉर्मचे बांधकाम, इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत.