Wardha: वर्धेच्या जागेसाठी काँग्रेस आक्रमक, एक नव्हे चौघे दावेदार, मुंबईत श्रेष्ठींना भेटले शिष्टमंडळ
By रवींद्र चांदेकर | Published: March 8, 2024 06:42 PM2024-03-08T18:42:03+5:302024-03-08T18:42:34+5:30
Wardha Congress News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या जागेवर दावा केला होता. मात्र, आता काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत वर्धेची जागा काँग्रेसने आपल्याकडेच ठेवावी, यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
- रवींद्र चांदेकर
वर्धा - एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या वर्धा लोकसभा मतदार संघाला गेल्या दोन निवडणुकीत भाजपने भगदाड पाडले. आता तर भाजपने दिलेल्या ‘अब की बार चार सो पार’च्या घोषणेने सर्वच हबकून गेले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अनेकांनी सुरूवातीला येथून लढण्यास नकार दर्शविला होता. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या जागेवर दावा केला होता. मात्र, आता काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत वर्धेची जागा काँग्रेसने आपल्याकडेच ठेवावी, यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
सुरूवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे उमेदवार नसल्याची चर्चा होती. आता काँग्रेसजन ही वार्ता विरोधकांनी पसरवली होती, असा दावा करीत आहे. वर्धा हा काँग्रेसचा परंपरागत मतदार संघ असून तो सहयोगी पक्षाला सुटू नये म्हणून काँग्रेस नेते आता एकत्र आले आहेत. त्यांनी हा मतदार संघ काँग्रेसकडेच राहावा, यासाठी जाेरदार फिल्डींग लावली आहे. त्यासाठी गेल्यावेळच्या पराभूत उमेदवार चारुलता टोकस (राव) यांच्यासह जिल्ह्यातील नेते एकत्र आले आहे. त्यांनी गुरुवारी मुंबई येथे काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत ही जागा काँग्रसनेच लढवावी, असा आग्रह धरला.
चरूलता टोकस (राव) यांच्यासह माजी आमदार अमर काळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, मोर्शीचे माजी आमदार नरेश ठाकरे, राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचे ही जागा काँग्रेसने लढवावी, यावर एकमत झाले आहे. श्रेष्ठींनी कुठल्याही समीकरणावर उमेदवार निवडावा, आम्ही सर्व सोबत असल्याचे त्यांनी पक्षाला कळविले आहे. त्यामुळे काँग्रेसकडे उमेदवार नाही, हा समज तूर्तास खोडून निघाला आहे. एवढेच नव्हे, तर या जागेसाठी चार जणांनी श्रेष्ठींकडे दावेदारी ठोकली आहे.
श्रेष्ठींच्या भूमिकेकडे लागले लक्ष
सर्वच पक्ष उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा गुंता सुटला नाही. महायुतीतसुध्दा ही जागा कोणाला सुटेल, कोण उमेदवार असेल, यावर अद्याप मतैक्य झाले नाही. त्यात काँग्रेस आक्रमक झाल्याने महाविकास आघाडीतील गुंता वाढण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसने या मतदार संघात काँग्रेसची मोठी बांधणी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा मतदार संघ सोडणे योग्य होणार नसल्याचे चारूलता टोकस (राव), अमर काळे, शेखर शेंडे, शैलेश अग्रवाल, नरेशचंद्र ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्रीव्दय सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पटवून दिले. त्याचवेळी अमर काळे, शैलेश अग्रवाल, शेखर शेंडे, नरेशचंद्र ठाकरे यांनी आम्ही चौघेही लढायला तयार आहोत, अशी ग्वाही दिली.