प्रफूल्ल लुंगे।आॅनलाईन लोकमतवर्धा : सेलू या तालुक्यातील ग्रामीण भागात चित्रित केलेला ‘ओंजळ’ हा लघुचित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहे. वर्धा जिल्ह्यातील हा पहिला चित्रपट ठरणार आहे. या लघुचित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन सुरज चाफले (२३) रा. सेलू या व्यवसायाने इंजिनियर असलेल्या युवकाने केले. चित्रपटाचे ट्रेलर यू-ट्यूबवर प्रदर्शित झाले आहेत. ओंजळच्या ट्रेलरने अडीच हजार व्ह्यूजचा टप्पा पार केला असून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणारा हा वर्धा जिल्ह्यातील पहिला लघुचित्रपट ठरणार आहे. ओंजळच्या निर्माता श्वेता चाफले असून कॅमेरामन व एडिटर नितीश कश्यप तर संगीत अजय डोणगे यांचे आहे. सहायक दिग्दर्शक गौरव पोहाणे, प्रॉडक्शन मॅनेजर कृष्णा कावळे, कला दिग्दर्शक अमर गाठे, कास्टिंग डायरेक्टर अभिजीत चौधरी आहे.चित्रपटाचे चित्रिकरण तालुक्यातील टाकळी (झडशी), रिधोरा, रायपूर, बेलगाव या भागात झाले आहे. चित्रपटाचे कथानक हे एका लहान मुलावर आधारित असून खडतर मागार्तून मिळालेले यश हे वाईट मार्गातील यशापेक्षा सुखद असते, असा संदेश ओंजळमधून देण्यात आला आहे. चित्रपटात स्थानिक मुलांच्या प्रमुख भूमिका आहेत.दारूबंदीच्या वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले अवैध दारू व्यवसायातील भयानक वास्तव ओंजळच्या निमित्ताने रूपेरी पडद्यावर येत आहे. गावठी दारू गाळण्याच्या व्यवसायात गुरफटलेल्या अल्पवयीन मुलांवर आधारित हा चित्रपट आहे.
ओंजळबाबत सूरज काय म्हणतो...ओंजळबाबत ‘लोकमत’शी बोलताना सूरज म्हणाला की, मी फिल्म रायटर्स असोसिएशन मुंबईची मान्यता असलेला वर्धा जिल्ह्यातील एकमेव लेखक व दिग्दर्शक आहे. मला लहानपणापासूनच चित्रपट सृष्टीचे आकर्षण असल्याने मी लेखन सुरू केले. यातून मला काही मोठ्या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.ओंजळ शिवाय रंगदार, संदल, मनचले यासारखे माझे मोठे प्रोजेक्ट नागराज मंजुळे, नागेश भोसले, फरहान अख्तर या मोठ्या दिग्दर्शकांकडे शार्टलिस्टेड असून निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.