लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरातील रहिवासी व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे.नवोदयमध्ये शिक्षण घेत असतानाच राकेशची निवड २००५ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय वायू सेनेत झाली. तिथे नोकरी करतानाच त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पर्यटन विषयात एम.बी.ए. केले. सध्या तो वायू सेनेत भूदल परीक्षक या पदावर कार्यरत आहे. भारतीय वायू सेनेमार्फत त्याने हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मिरमधील हिमालयाच्या सहा उंच शिखरांवर यशस्वीरित्या चढाई केली आहे. हे ध्येय पूर्ण करीत असतानाच त्याला मिशन अंटार्क्टिकाची संधी चालून आली. हजारो वायू सैनिकांमधून भारतीय वायू सेनेने मिशनसाठी पाच सैनिकांची निवड केली. त्यामध्ये राकेशचा समावेश होता.अंटार्क्टिका खंडातील सर्वाच उंच शिखर माऊंट विन्सन पादाक्रांत करण्यासाठी राकेशसह पाच सदस्यांची चमू १२ डिसेंबर २०१७ ला रवाना झाली. १६ डिसेंबर २०१७ ला चमू चिलीया देशात पोहोचली. चिलीच्या भारतीय राजदूत अनिता नायर यांनी १९ डिसेंबरला चमूला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. ७ हजार ७५७ मीटर उंचावर, उणे ३० ते ५० डिग्री तापमानात हाडे गोठवणाऱ्या थंडीत चोवीस तास प्रकाशात ४० ते ५० कि़मी. वेगाने वाहणाऱ्या बर्फाच्या वादळात ४० किलो वजनाचे सामान पाठीवर बांधून रोज ९ तास अनेक अडथळे पार करीत २६ डिसेंबरला ही चमू अंटार्क्टिकाच्या सर्वात उंच शिखरावर पोचली आणि भारताचा तिरंगा व वायू सेनेचा झेंडा तिथे फडकविला.मिशन पूर्ण करून ११ जानेवारीला चमू वायूसेना मुख्यालयात दाखल झाली. तेथे वायूसेना अध्यक्षांनी चमूला प्रशस्तीपत्र व पदक देऊन सन्मानित केले.
वर्धेच्या तरुणाने रोवला अंटार्क्टिकावर तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 2:27 PM
वर्धा शहरातील रहिवासी व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे.
ठळक मुद्देसहा उंच शिखरांवर यशस्वीरित्या चढाई वायू सेनेत भूदल परीक्षक