वर्धा : कोविड काळात प्रत्येक गरजूला वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला मिळावा या हेतूने शासनाने ई-संजीवनी ॲप व संकेतस्थळ सुरू केले आहे. याच ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला मिळविण्यात वर्धेकर राज्यात तिसऱ्या स्थानी आहेत. ऑनलाईन पद्धतीचा वापर करून आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यावर कोविड-नॉन कोविड विषयात अगदी सोप्या शब्दात रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना वेळीच मार्गदर्शनासह औषधोपचार सांगितल्या जात आहे. त्यामुळे शासनाचा हा उपक्रम गरजू आणि गरिबांसाठी उपयुक्त ठरत आहे.कोरोना काळात संचारबंदीमुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात जाणे शक्य होत नसल्यामुळे केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून गरजू आणि गरिबांना वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला मिळावा म्हणून ई-संजीवनी ॲप आणि संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरल्यावर रुग्णाविषयी आवश्यक अहवाल सादर केल्यावर तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यासाठी वेळ देतात. याच वेळात तज्ज्ञ डॉक्टर कोविड बाधितांसह इतर आजारांच्या रुग्णांना रुग्णाने सादर केलेल्या अहवालांचे अवलोकन करून त्याला औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी विषयीचा सल्ला देतात.जिल्ह्यात यासाठी १५५ उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १९४ डॉक्टरांची नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व डॉक्टरांशी ऑनलाईन संवाद साधून उपचार सांगितला जातो. या संकेतस्थळाचा वापर करून एप्रिल महिन्यापर्यंत ५०३१ वर्धेकरांनी ऑनलाईन वैद्यकीय मार्गदर्शन घेतले आहे. कोरोनाच्या काळात रुग्णालयात गर्दीत ताटकळत बसण्यापेक्षा तज्ज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन घेऊन आजारांवर उपचार घेण्यास वर्धेकरांनी पसंती दिली आहे.
ई-संजीवनीवर वैद्यकीय सल्ला मागण्यात वर्धेकर राज्यात तिसऱ्या स्थानी, कोविड-नॉन कोविड विषयात सांगतात औषधोपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 6:40 PM