लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : १० मे रोजी वर्ध्यात कोविडचा पहिला रुग्ण सापडला असला, तरी मार्च महिन्यात कोरोना आजाराची दहशत प्रचंड होती. इतकेच नव्हे, तर नेहमी वर्दळ राहणारे रस्ते निर्मनुष्य होती. असे असले, तरी जिल्हा सामान्य याच संकट काळात ८९३ प्रसूती झाल्यात. कोरोनायनात वर्ध्याकर इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून नवजात बालकांना वेळोवेळी लसीकरण करून घेतल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला असून, शासकीय रुग्णालयांत नॉर्मल प्रसूतीवर भर दिला जात आहे.प्राप्त माहितीनुसार २०१५-१६ मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९४७ होता, तर सन २०१९-२० मध्ये एक हजार मुलांमागे तो ९७९ झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे, ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानंतर पुढे आली असून, तशी नोंद जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. गर्भवती महिलेची नोंदणी होताच गरोदर महिलेला ‘टीडी’च्या लसीची पहिली मात्रा दिली जाते. त्यानंतर, एक महिन्यांच्या अंतराने ‘टीडी’च्या लसीची दुसरी मात्रा दिली जाते. तर नवजात बालकाला २४ तासांच्या आत शून्य एचबी, ओपीव्ही, बीसीजीची लस दिली जाते. बालक दीड महिन्यांचा झाल्यावर पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरस, आयटीव्ही लसीची पहिली मात्रा दिली जाते. अडीच महिन्यांनंतर बालकास पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरस लसीची दुसरी मात्रा दिली जाते, तर बालक साडेतीन महिन्यांचे झाल्यावर पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरसची तिसरी मात्रा दिली जाते. बालक नऊ महिन्यांचे झाल्यावर एमआर आणि व्हिटॅमिनची लस दिली जाते. या लसी बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने, वर्ध्याकरांनीही कोरोना संकटाच्या काळात मनात कुठलीही भीती न बाळगता आणि न चुकता आपल्या बालकांना लसी दिल्या आहेत.राज्यात पहिल्या पाचमध्ये वर्ध्याचा समावेशकोरोनाची लस आली असली, तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. असे असले, तरी कोविड संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी सातत्याने कार्यरत राहून सेवा देत आहेत. कोरोना काळात बालकांना लस देण्याच्या मोहिमेत राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांत वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. प्रत्येक महिन्यात लसीकरणाचे आकडे वेगवेगळे असतात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांनी सांगितले.
बालकाच्या निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या लहान मुलांना न चुकता नियोजित वेळी लसीकरण केले पाहिजे. शासकीय रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. - डॉ.प्रभाकर नाईक, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा