वर्धा : भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाव्दारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘आझादी से अंत्योदय तक’ या मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये देशातील ७५ जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ‘टॉप-१०’ जिल्ह्यांमध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश असून तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचा दिल्लीतील एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्रनाथ सिन्हा, उपसचिव आशिष कुमार गोयल, ग्रामविकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव कर्मा जिम्पा भुटीया, उमा नांदुरी, उपसचिव दिनेश कुमार आणि ९ मंत्रालयाचे सचिव तसेच दहा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत या सत्कार सोहळ्यादरम्यान वर्ध्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केलेल्या कामांचे सादरीकरण केले. त्यानंतर या मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओम्बासे व जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रवीण कुऱ्हे यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
‘आझादी से अंत्योदय तक’ या ९० दिवसांच्या मोहिमेत देशातील महत्त्वाच्या १०० स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित सैनिकांचे जन्मस्थान असणाºया ७५ जिल्ह्यांमध्ये विकास कार्यांना गती देण्यासाठी भारताने ‘एकम अंत्योदय’ मोहीम सुरू केली होती. त्यात महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यामध्ये नासिक व रायगड सोबत वर्धा जिल्ह्याची निवड करण्यात आली. त्यात भारत सरकारने ९ मंत्रालयांच्या एकूण १७ योजनांचा समावेश केला होता. वर्धा जिल्ह्याने २८ एप्रिल २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ही मोहीमेत युद्ध पातळीवर राबवून उत्त्कृष्ट कामगिरी करणाºया देशातील ‘टॉप-१०’ जिल्ह्यात ९ वा क्रमांक मिळविला.