वर्धा : नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत पाच जिल्ह्यातील अठरा स्पर्धकांना मात देत वर्ध्यातील जलतरणपटू रुद्र जयेश डांगे याने अव्वल स्थान पटकावून नाव लौकीक मिळविले.
नागपूर येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये रविवारी विभागीय स्तरावरील जलतरण स्पर्धा पार पडली. यात प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा व नागपूर जिल्ह्यातील अठरा स्पर्धक ११ वर्षांआतील वयोगटात सहभागी झाले होते. स्पर्धेत वर्ध्याचा जलतरणपटू रुद्र डांगे याने ५० मीटर फ्री-स्टाईल, बटरफ्लाय आणि ब्रेस्ट स्ट्रोक या तिन्ही विभागात ‘सिल्वर’ मेडल प्राप्त करुन अव्वल स्थान पटाकविले.
रुद्र जयेश डांगे हा येथील सेंट अँन्थोनी नॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. तो पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आशा डांगे व सेवाग्राम पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई जयेश डांगे यांचा मुलगा आहे. त्याची आई उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू असून त्यांनी पोलीस संघाकडून अनेक स्पर्धेत सहभागही घेतला आहे. जलतरण प्रशिक्षक समीर अनिस शेख यांच्या मार्गदर्शनात रुद्रने जलतरणाचे धडे गिरवले असून त्याला यशही प्राप्त झाले आहे.
रुद्रने त्याच्या यशाचे श्रेय प्रशिक्षक समीर शेख व आई वडिलांना दिले आहे. सेवाग्राम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांनी फोन करून रुद्रचे अभिनंदन केले तसेच त्याला पुढील काळात उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.