सहा दारूविक्रेत्यांना अटक : ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : दारूबंदीची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सावंगी (मेघे) पोलिसांनी पांढरकवडा पारधी बेड्यावर सोमवारी सकाळी वॉश आऊट मोहीम राबविली. यात सहा दारूविक्रेत्यांना अटक करीत गावठी दारूसाठ्यासह ४ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सावंगी पोलिसांनी वॉश आऊट मोहिमेंतर्गत दारूविक्रेत्यांनी जमिनीत गाडून ठेवलेले मोह रसायन सडवा भरलेल्या ड्रमचा शोध घेत जेसीबीच्या साह्याने ते फोडले. हजारो लिटर मोह रसायन सडवा यावेळी सावंगी पोलिसांनी नष्ट केला. या कारवाईत पोलिसांनी दारूविक्रेता श्याम श्रावण धाडवे (२२) रा. गजानननगर, लता प्रमोद काळे (४०), शालू महादेव पवार (३०), सोनू उर्फ चंद्रपाल हरीष पवार (२५) तिन्ही रा. पांढरकवडा पारधी बेडा, दौलत नारायण राऊत (५१) रा. इंदिरानगर वर्धा व किसन रामाजी मोहनकर (५२) रा. गजानननगर वर्धा यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर, प्रकाश लोंढेकर, बिसने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.
पांढरकवडा बेड्यावर वॉश आऊट मोहीम
By admin | Published: June 14, 2017 12:53 AM