महेश सायखेडे
वर्धा : स्तनदा मातांना त्यांच्या चिमुकल्यांना दूध पाजता यावे, या उद्देशाने विविध शासकीय कार्यालय तसेच बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी हिरकणी कक्ष निर्माण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून तत्कालीन कार्यकारी अभियंता अभियंता सुनील रहाणे यांच्या कार्यकाळात वर्धा पाटबंधारे विभाग कार्यालयात हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली; पण याच कार्यालयातील हिरकणी कक्षात सध्या कचराच कचरा असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले आहे.
विशेष म्हणजे या कार्यालयाचा प्रभार महिला अधिकारी नीतू चव्हाण यांच्याकडे आहे. मात्र, त्यांचे कार्यालयाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने महिला अधिकाऱ्याच्या कार्यकाळातच स्तनदा मातांची चांगलीच कुचंबणा होत आहे. स्तनदा मातांची बाजू समजू शकणाऱ्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत दुर्लक्षित धोरणाचा कळस गाठणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या महिला अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे.
कर्मचाऱ्यांना उकाडा सहन करीत करावे लागते काम
वर्धा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात एसी बसविण्यात आला आहे. तर इतर विभागात कूलर लावण्यात आले आहे; पण या कूलरमध्ये नियमित पाणीच भरले जात नसल्याने कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जीवाची लाहीलाही होणाऱ्या उकाडा सहन करीत आपले कार्यालयीन काम पूर्ण करावे लागत आहे. कार्यकारी अभियंता कार्यालयात येतच नसल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ ओढावल्याची ओरड सध्या होत आहे.
विविध विभागातील संगणक आजारीच
हस्तलिखितपेक्षा ऑनलाइन किंवा संगणकाच्या आधारे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आपले दैनंदिन काम पूर्ण करावे, असा आग्रह सध्या शासनाकडून धरला जात आहे; पण वर्धा पाटबंधारे विभागातील वर्धा उपविभाग यासह विविध विभागातील काही संगणक मागील चार महिन्यांपासून आजारी असल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना हस्तलिखितवर भर देत आपली कामे पूर्ण करावी लागत आहे. कार्यकारी अभियंता कार्यालयात कार्यालयात येतच नसल्याने नादुरुस्त संगणकाबाबत माहिती देऊ तरी कुणाला, असे कर्तव्य बजावत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
उघड्या वायरी देतायत अनुचित घटनेला निमंत्रण
वर्धा पाटबंधारे विभागात ठिकठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरी निम्म्याहून ठिकाणी उघड्याच आहेत. इतकेच नव्हे तर या उघड्या वायरी खालीच कार्यालयीन काही दस्ताऐवज गठ्ठा करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे.
कूलर सुरू करण्याबाबत इस्टिमेट पाठविले आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर कूलर सुरू केले जातील. हिरकणी कक्षात कचऱ्याचा खच असणे चुकीचे असून, तो कक्ष व्यवस्थित करण्याच्या सूचना देण्यात येईल. कार्यालयातील संगणक फार जुने असून, वेळोवेळी आम्ही ते दुरुस्त करून घेतो. पदभार स्वीकारल्यापासून वर्धा पाटबंधारे विभागात आपण आलो नाही, ही बाब साफ चुकीची आहे.
- नीतू चव्हाण, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे, वर्धा.