लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : सेवाग्राम विकास आराखड्याच्या अंतर्गत पवनार इथे इको फॉरेस्ट टुरिझम पार्कच्या उभारणीसाठी २ कोटी ५४ लाखाचा खर्च करण्यात आला. मात्र, सदर पार्क हा इको टुरिझम न ठरता भकास टुरिझम म्हणून नावलौकीकास आल्याचे दिसून येते. इथे लावण्यात आलेले ब्लॉक बाहेर पडताना दिसत आहेत. तसेच बाकीचे केलेले कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले दिसून येत आहे.
या पार्कमध्ये लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी मृत झाली असून, ठिबक सिंचनाची सोय ही दिखाव्यापुरती करण्यात आल्याचे दिसते. एकाही नळीतून पाण्याचा प्रवाह दिसत नाही. रस्त्यांमध्ये लावलेले पेव्हिंग ब्लॉकसुद्धा उखडले असून, झालेल्या कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असल्याचे कुणाच्याही लक्षात येईल. जिकडे तिकडे गवत झुडुपे वाढलेली असून, याचा फायदा फक्त जनावराचे कुरण म्हणून घेता येईल, अशी सद्यस्थिती आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
इको टुरिझम पार्कच्या उद्देशाला लवकरच तडेसामाजिक वनीकरणच्या जागेत हा पार्क उभारला असून, याची उभारणी करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. मात्र, बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. करोडो रुपयांचे पार्क तयार करण्यात आले. परंतु, त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत नसेल तर करदात्यांच्या पैशांची ही उधळपट्टी नव्हे काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या कामाची चौकशी करण्याची होतेय मागणीहीच परिस्थिती सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत धाम नदीच्या विकासाबाबत दिसून येते. तिथलीसुद्धा संपूर्ण झाडे वाळून गेली आहेत. त्याामुळे सर्वत्र रखरख दिसून येते. याआधीचा परिसर आतापेक्षा सुंदर होता, असे पर्यटक बोलून दाखवितात. करोडो रुपये खर्च करून धाम तीरावर विकासकामे करण्यात आली. परंतु, कामे पाहता खरच करोडो लागले असतील का, असा सवाल गावकरी करत आहेत. सदर झालेल्या कामाची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी गाव स्तरातून होत आहे.