वडगाव (कला) च्या चिमुकल्यांची शिवपूजा : ग्रामपंचायतीला स्वचछता राखण्याचे आवाहनसेलू : तालुक्यातील वडगाव (कला) येथील चिमुकल्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी एकत्र येत अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला जनावरांच्या पाण्याचा हौद चिमुकल्यांनी स्वच्छ केला. चिमुकल्यांच्या या कार्याची माहिती मिळताच गावातील तरुण व ज्येष्ठांना आश्चर्यांचाच धक्का बसला. गावातील ग्रामपंचायतजवळ जनावरांना पाणी पिण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी मोठा हौद बांधला होता. हौद भरण्यासाठी नळाची व्यवस्था केली. ग्रामपंचायतीने हौद बांधला तेव्हापासून साफसफाईच करण्यात आली नव्हती. पाण्यासाठी भटकणारी जनावरे तहानेने व्याकूळ असताना हौदात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने ते पिण्यास धजावत नव्हते. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनासह गावकऱ्यांना हे दृष्य दिसत असतानाही त्यांच्याकडून या हौदाची स्वच्छता झाली नाही. गावातील चिमुकल्यांना पाण्यासाठी वणवण भटकणारे जनावरे अस्वस्थ करीत होती. महाशिवरात्रीच्या दिवशी अख्ये गाव शिवलिंगाला अभिषेक करण्यात व्यस्त असताना आठ ते दहा चिमुकल्यांनी एकत्र जनावरांसाठी असलेला पाण्याचा हौद स्वच्छ केला. यामुळे साऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरीत या चिमुकल्यांचे कार्य पाहून गावातील तरुण व ज्येष्ठांसमोर एक नवा आदर्श उभा केला. या हौदाच्या सफाईसाठी गितेश तिमांडे, योगेश पारसे, रूपेश पारसे, सिद्धेश तितरे, केतन वाघमारे, अनिकेत पारसे, विशाल पारसे, साहिल फाटे, तन्मय मसराम या चिमुकल्यांनी परिश्रम घेत स्वच्छ केलेला हौद तसाच स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आता ग्रामपंचायतीने घेण्याची गरज आहे. याचा विचार येथील सदस्यांनी करावा, असे बोलले जात आहे.(तालुका प्रतिनिधी) अनेक वर्षांपासून हौदाची साफसफाई झालीच नव्हतीजनावरांना पाणी पिण्यासाठी ग्रामपंचायतीसमोर हौद बांधला. मात्र त्यात पाण्याऐवजी कचरा पडल्याने त्याची दुर्गंधी सुटली होती. हौदातील कचरा तिथेच सडला होता. यामुळे डासांचे प्रमाणही वाढले होते. असे असताना याकडे कुणी ढूंकूनही पाहिले नाही. चिमुकल्यांनी मात्र स्वयंप्रेरणेने पुढाकार घेत हौदाची सफाई करून मुक्या जनावरांच्या पाण्याची सोय केली आता स्वच्छ पाणी जनावरांना उपलब्ध झाले.
चिमुकल्यांनी स्वच्छ केला जनावरांच्या पाण्याचा हौद
By admin | Published: March 11, 2016 2:34 AM